बीड : जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात पावसाने उसंत घेतली होती. मात्र मागील २४ तासात झालेल्या पावसामुळे १८ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बीडच्या गेवराई आणि शिरूर कासार तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला असून यामुळे खरिपाच्या पिकांचे यामुळे नुकसान झाले आहे.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसानंतर मध्यंतरीच्या काळात पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले होते मात्र गेल्या २४ तासात गेवराई आणि शिरूर कासार तालुक्यात सर्वाधिक ९४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गेवराई तालुक्यातील धोंडराई १९८.३ मिमी, उमापूर १३९.३मिमी, रेवली १४३ मिमी, तलवाडा ९४ मिमी, गेवराई ८८ मिमी, चकलांबा १३१.८ मिमी तर शिरूर कासार तालुक्यात शिरूर ९१.५ मिमी, रायमोह १२१.८ मिमी,ब्रह्मनाथ येळंब १०९ मिमी,तींतरवनी १००.८ मिमी, खालापुरी ९६.५ मिमी पावसाची नोंद झाली. या महसूल मंडळासह बीड पाटोदा आणि परळी तालुक्यातील काही मंडळांमध्ये देखील अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळामध्ये काढणीला आलेल्या खरिपांच्या पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे.प्रामुख्याने सोयाबीन,कापूस,मूग या पिकांचे प्रामुख्याने नुकसान झालेले आहे. पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी नदीला पूर आला असून नदी तीरावरील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे असलेले शनी मंदिर पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहे. प्रशासनाकडून गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जायकवाडी धरणातून शनिवारी रात्री पासूनच नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. पाणीपातळी वाढल्यास गेवराई तालुक्यातील गुंतेगावं, बोरगांव, पाथरवाला, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळसपिपंळगावं, नागझरी, खामगाव, आगरनादुंर, पांढरी, मिरगावं, पागुळगावं, राजापुर, रामपुरी, भोगलगावं आदि गावांना पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता आहे.
माजलगाव धरणातून सिंधफणा नदीपात्रात विसर्ग
माजलगाव येथे असलेल्या धरणातून धरणाचे १० वक्र दरवाजे ०.८० मीटरने वर उचलत सिंदफणा नदी पात्रात ३१ हजार ३३५ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. माजलगाव धरणातील सोडण्यात आलेले पाणी आणि गोदावरीतील पूरस्थितीमुळे सिंदफणा नदीची पाणी पातळी वाढल्याने माजलगाव, मंजरथ व ढालेगाव नदीकाठच्या गावामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.