पंढरपूर : सोलापूर शहरासह पंढरपूर तालुक्यात पावसाने शनिवारी पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. सोलापूर शहरात दुपारी दोन तास मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागांत पुन्हा पाणी साचल्याचे दिसून आले. तर, दुसरीकडे पंढरपुरात सकाळी जोरदार तर सायंकाळी पावसाची संततधार सुरू होती. ग्रामीण भागात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
मात्र, सततच्या पावसाने बळीराजा हवालदिल झाला आहे. या पावसाचा फटका केळी, द्राक्षे, डाळिंब या पिकांना, तसेच काढणीस आलेल्या पिकाला बसणार आहे. दरम्यान, या पावसाने व्यापारी, नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
सोलापूर शहरात पुन्हा एकदा धडकी भरणाऱ्या पावसाने हजेरी लावली. गेल्या चार दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. आणि शहरातील अनेक सखल भागासह राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना शनिवारी पावसाने पुन्हा हजेरी लावली. शहरात दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दोन तास पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसाने शहरातील अनेक सखल भागात पुन्हा पाणी साचले.
शहरातील पेट्रोल पंप, रस्ते, गल्ली या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याचे चित्र होते. काही वेळाने पावसाचा जोर कमी झाल्याने काही ठिकाणचे साचलेले पाणी ओसरत होते. शहरातील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू आहे. महापलिकेची यंत्रणा सज्ज आहे. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्याचे पंचनामे सुरू करण्यात आले असल्याची माहिती सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिली आहे.
दरम्यान, पंढरपूर शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी ११ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाचा जोर वाढला. एक तास जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले. आषाढी वारीमध्ये लाखो रुपये खर्च करून रस्त्यांची कामे करण्यात आली होती. मात्र, अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनचालक, नागरिकांची मोठी गैरसोय झाली. तसेच सलग दोन दिवस सुटी असल्याने दर्शनासाठी भाविक दाखल झाले आहेत. या पावसाने भाविकांची तारांबळ उडाली. मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेऊन भाविक थांबलेले दिसून आले.
ग्रामीण भागातदेखील पावसाने हजेरी लावली. यंदा सततच्या पावसाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. काढणीला आलेल्या पिकांना धोका झाला आहे. मकालागवड लांबल्याची, तसेच द्राक्षे, डाळिंब या पिकांना रोगराईची भीती निर्माण झाली आहे. तसेच हवेत बदल झाला आहे. एकंदरीत यंदा पावसाने पाण्याचा प्रश्न जरी संपला असला, तरी इतर संकटे देऊन जात असल्याने आता पाऊस थांबू दे, अशी प्रार्थना नागरिक करत आहेत.