मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस (ता. हिंगोली) साठवण तलाव प्रकल्पासाठी ९० कोटी ६१ लाख रुपये आणि सेनगांव तालुक्यातील सुकळी साठवण तलाव प्रकल्पासाठी १२४ कोटी ३६ लाख रुपये, असे एकूण २१४.९७ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

हिंगोली तालुक्यातील डिग्रस साठवण तलाव लघु प्रकल्प आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारितील असलेल्या या डिग्रस गावाजवळील नाल्यावर ३.७१ द.ल.घ.मी. क्षमतेचे मातीचे धरण बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पातून हिंगोली तालुक्यातील डिग्रस, लोहगाव आणि दाटेगावांतील ६०३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

सेनगाव तालुक्यातील सुकळी साठवण तलाव प्रकल्पासाठी १२४ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारित सुकळी गावाजवळील नाल्यावर ४.०७ द.ल.घ.मी. क्षमतेचे मातीचे धरण बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पातून सेनगाव तालुक्यातील सुकळी आणि दाताळा गावांतील एकूण ६७७ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पामुळे हिंगोली जिल्ह्यातील उद्योग, शेती आणि इतर विकास कामांना चालना मिळणार आहे.