काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल (रविवार) महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी एका कार्यक्रमात बोलताना “आजच्याच दिवशी महात्मा गांधींचा वध नथुराम गोडसेने केला” असं वादग्रस्त विधान केलं. यावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांचा या विधानावरून टीका करत, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पटोलेंना पदावरून बरखास्त करण्याची देखील मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने समाजविघातक वक्तव्य करून सामाजिक शांतता बिघडवित आहेत. आपल्या पक्षासोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद असले तरी राष्ट्राचे हित जिथे असते तिथे सर्व प्रकारचे मतभेद विसरून आपण एकत्र यावे हा आपल्या समृद्ध लोकशाहीचा संस्कार आहे. त्याच भावनेतून आपणास हे पत्र लिहीत आहे.”

“पटोले यांनी अलीकडच्या काळात दोन वादग्रस्त विधाने केली आहेत. या विधानांमुळे समाजमन संतप्त आहे. पटोले यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणारे विधान केले. पटोले यांच्या या वक्तव्यामुळे समाजातीलव सर्व क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया आली. पटोले यांचा सर्वांनीच तीव्र निषेध केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपले प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा ‘वध’ असा उल्लेख केला. वध हा राक्षसांचा होत असतो, महापुरुषांचा नाही, ही सामान्य गोष्ट या जबाबदार व्यक्तीला समजू नये, ही अत्यंत खेदाची बाब आहे.”

आजच्याच दिवशी महात्मा गांधींचा वध नथुराम गोडेसेने केला – नाना पटोलेंचं विधान!

तसेच, “या दोन्ही आक्षेपार्ह आणि अवमानकारक विधानाबद्दल पटोले यांनी माफी देखील मागितलेली नाही. काँग्रेस पक्ष हा या देशातील जुना पक्ष आहे. या पक्षाचा एक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर अपमान करतो आणि काँग्रेस पक्ष त्या प्रदेशाध्यक्षाची ही विकृती खपवून घेतो, ही बाब सर्वांनाच खटकणारी आहे. पटोले हे अशा विकृतीच्या माध्यमातून समाजात अशांतता निर्माण करत आहेत. अशा बेजबाबदार वक्तव्यावर आपण कठोर कारवाई करावी आणि त्यांना पदावरून तातडीने बरखास्त करावे, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून आपणास करीत आहे.” असं देखील बावनकुळे यांनी पत्रात म्हटलेलं आहे.

काँग्रेसने आतापर्यंत नेहमीच महात्मा गांधींचा वध अशा शब्दप्रयोगाला आक्षेप घेतलेला आहे. मात्र आज खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडूनच आणि महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशीच अशा शब्दप्रयोग केला गेल्याचं समोर आलं आहे. दरम्यान आता पटोलेंच्या या विधानावरून राजकारण तापण्याची शक्यता दिसत आहे.

“आजच्या दिवशीच पहिला दहशतवादी या देशात महात्मा गांधींच्या हत्याऱ्याच्या रूपाने नथुराम गोडसे हा पुढे आला आणि आजच्याच दिवशी महात्मा गांधींचा वध नथुराम गोडेसेने केला.” असं नाना पटोले म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Immediately remove congress state president nana patole from office letter from chandrasekhar bavankule to sonia gandhi msr