अलिबाग : उदय सामंत यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याला पालकमंत्री लाभले आहेत. ते कोकणातीलच आहेत. रायगड आणि रत्नागिरी दोन्ही जिल्ह्याचे काम ते चांगल्या पध्दतीने सांभाळत आहेत. त्यामुळे एक पालकमंत्री असताना मी पालकमंत्री होणे या गोष्टीला फारसे महत्व द्यायला नको, असे म्हणत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी पालकमंत्री पदाच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्या अलिबाग येथे महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये बेबनाव असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही असल्याचे बोलले जात होते. पण शिवसेना आमदारांच्या विरोधामुळे आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद देण्यात आले नव्हते. त्यामुळे आदिती तटकरे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. पण कुठल्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असावा, हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे यासंदर्भात नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही. मला ज्या खात्याचा पदभार दिला आहे, त्यात चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे तटकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह कुणाचं? निवडणूक आयोगासमोरील सुनावणी संपली; शरद पवार गटाचे वकील म्हणाले…

कुठले पद कोणाकडे आहे. यापेक्षा आम्ही सगळे सत्तेत आहोत, सगळ्यांच्या सहकार्याने काम करत आहोत, रायगड जिल्ह्याला याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करत आहोत. अलिबाग येथील मेडीकल कॉलेजचा प्रश्न रेंगाळला होता. त्यासंदर्भात दोन बैठका घेऊन तो मार्गी लावला आहे. माणगाव येथील विभागीय क्रीडा संकूलाला मंजूरी मिळाली होती. पण त्यात तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर केल्या. रोहा येथील जिल्हा महिला रुग्णालयाचे काम मार्गी लावले आहे. त्यामुळे पदापेक्षा जनतेची कामे कशी मार्गी लावता येतील याला जास्त महत्व असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. उदय सामंत हे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत, असे म्हणत त्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In alibag minister aditi tatkare says raigad guardian minister uday samant doing good work for raigad and ratnagiri district css