राहाता: चार दिवसांपूर्वी टाकळी शिवारात (ता. कोपरगाव) ऊसतोडणी कामगाराच्या तीनवर्षीय मुलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना ताजी असतानाच आज, सोमवारी सकाळी येसगाव शिवारात (ता. कोपरगाव) भास्कर वस्ती येथे शेतात काम करणाऱ्या एका वृद्धेवर बिबट्याने हल्ला केला, त्यात महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको केल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शांताबाई अहिलाजी निकोले (वय ६०) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात ऊसतोडणी कामगाराच्या तीनवर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला होता यात त्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी टाकळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन लवकरच नरभक्षक बिबट्याला जेरबंद करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना आज सकाळी शांताबाई शेतात चारा कापत असताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. हा हल्ला अचानक आणि जोरदार होता, की वृद्धेला सुटकेची संधीच मिळाली नाही. तिचा जागीच मृत्यू झाला. संतप्त ग्रामस्थांनी नगर–मनमाड महामार्गावर उतरून पुन्हा रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांनी वन विभागाच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. सलग तीन हल्ल्यांनंतरही वनविभाग आणि प्रशासन याकडे डोळेझाक करते आहे का, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी विशेष पथक नेमावे आणि परिसरात पिंजरे लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. आमदार काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधत, तर स्नेहलता कोल्हे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधत नरभक्षक बिबट्याला ठार करा, अशी मागणी केली.
अन्य एक महिला बचावली
कोपरगाव तालुक्यात आज एकाच दिवशी दोन महिलांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. येसगाव शिवारात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी घटना सुरेगावमध्ये अनिल वाबळे यांच्या शिवारात घडली. तेथे शेतात कापूस वेचत असलेल्या दुसऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या सोबत असलेल्या इतर महिलांनी आरडाओरड करून आणि दगडफेक करून बिबट्याला पळवून लावले. या महिलेला किरकोळ दुखापत झाली असून तिला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
