बीड : कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा विशेष लोभ असलेल्या परळी मतदारसंघात त्यांच्या पक्षाची स्थिती मात्र दिवसेंदिवस खालावत चालल्याचे दिसून येत आहे.गतवर्षातील दोन्ही निवडणुकांच्या काळात परळी विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे पदाधिकारी गायब झाल्याचे चित्र असून,यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पक्षाकडून ना मंडप उभारण्यात आला ना,कोणता कार्यकर्ता पदाधिकारी त्या ठिकाणी दिसून आला. हा सर्व प्रकार अंतर्गत गटबाजीतून होत असून यामुळे मतदारसंघात पक्षाची वाताहत होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही काळात तालुकाध्यक्षपदावरून स्थानिक पातळीवर कुरघोड्या झालेल्या दिसून आल्या.परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात विविध पक्षांकडून निवडणुकीच्या स्वागतासाठी मंडप घालण्यात आले होते. मात्र या ठिकाणी स्वागत मंडप सोडाच पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक पदाधिकारीही या ठिकाणाकडे फिरकला नाही. मुंडे – पवारांमधील असलेला संघर्ष हा सर्व राज्याला परिचित आहेत. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे परळी मतदारसंघावर सुरुवातीपासूनच विशेष लक्ष राहिलेले आहे.

विधानसभा निवडणुका असो किंवा लोकसभा निवडणुका अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादेखील पवार हलक्यात घेत नाहीत याची प्रचीती अनेक वेळा पाहायला मिळालेली आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा कार्ड खेळत पवारांनी शेतकरी पुत्राला खासदार करून दाखवले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही पवारांनी मराठा पत्ता बाहेर काढला होता. तेव्हापासून परळी मतदारसंघाला राजेसाहेब देशमुख यांच्या रुपात मतदार संघाबाहेरील नेता भेटला.अर्थातच तेव्हा राजेसाहेबांचे नाव खासदारांकडूनच आल्याची चर्चा रंगलेली होती.

आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मतदारसंघात दुर्लक्ष झाल्याची चर्चा सुरू आहे.विधानसभेतील पराजयानंतर राजसाहेब देशमुख यांचे परळी मतदारसंघाकडे फारसे लक्ष नसल्याची अंतर्गत चर्चा रंगलेली असते.मध्यंतरी तालुकाध्यक्षांच्या निवडीवरून देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील गटबाजी दिसून आली होती. त्यानंतर आता गणेशोत्सवातील विसर्जनाच्या दिवशी राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात राष्ट्रवादी गटाचा स्वागत मंडप नसल्याने त्याची जोरदार चर्चा जिल्हाभरात होऊ लागली आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले राजेसाहेब देशमुख हे केवळ राष्ट्रवादीचा बडा नेता आल्यावरच उपस्थित असतात. मात्र त्यानंतर परळी मतदारसंघाकडे ते फिरकत नसल्याचे एका कार्यकर्त्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

परळीत यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत परळीत मंडप का नव्हता, याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्याकडून माहिती घेऊ – राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट).

सध्या मतदारसंघातील परिस्थिती बरोबर नसल्याने एकमेकांच्या भावना दुखावू नयेत म्हणून सर्वच पक्ष काम करत आहेत.सध्या जे परळीचे वातावरण आहे व्यवस्थित रहावे व काही नवीन प्रश्न होऊ नयेत म्हणून कदाचित विसर्जन मंडप पक्षाकडून लावण्यात आला नसेल. – राजेसाहेब देशमुख,पराभूत परळी विधानसभा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)