सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापुरातील पाच माजी नगरसेवकांनी अपेक्षेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री तथा सोलापूरचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मध्यस्थीने मुंबईत त्यांच्याच कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. या पक्षप्रवेशामुळे पवार गटास धक्का बसला आहे.
पक्षाचे शहर कार्याध्यक्ष तौफिक इस्माईल शेख यांच्यासह सोलापूर महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती इब्राहिम कुरेशी, वाहेदाबी शेख, नूतन गायकवाड आणि तस्लिम शेख या पाच माजी नगरसेवकांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडून अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला धक्का बसला आहे.पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आणि ‘बाहुबली’ म्हणून ओळखले जाणारे तौफिक शेख यांनी नंतर एमआयएम पक्षात जाऊन आमदारकीचे स्वप्न पाहिले.
विशेषत: २०१४ साली त्यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरुद्ध द्वितीय क्रमांकाची मते घेऊन कडवी झुंज दिली होती. महानगरपालिका सभागृहात तीन वेळा प्रतिनिधित्व केले होते. एमआयएम पक्षातही भ्रमनिरास झाल्यामुळे तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणे पसंत केले खरे; परंतु नंतर पक्षात फाटाफूट होऊन अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मोठा गट सत्ताधारी महायुतीसोबत गेल्यामुळे शेख हे पुन्हा राजकीयदृष्ट्या अडचणीत आले. त्यामुळे त्यांना शरद पवार यांच्याच राष्ट्रवादी पक्षात राहून दिवस काढावे लागत होते.
दरम्यान, गेल्या महिन्यात सोलापुरात ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत व्यासपीठावर नेत्यांच्या शेजारी बसायला खुर्ची न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेख यांनी तत्काळ बैठक सोडून बाहेर पडत पक्षाचा राजीनामा दिला होता. त्याच वेळी ते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या भूमिकेत होते. शेवटी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन अजित पवार यांच्या गटात जाण्याचा मुहूर्त साधला. आश्चर्य म्हणजे हा पक्षप्रवेश होताना पक्षाचे स्थानिक अध्यक्ष संतोष पवार व इतर मंडळी हजर नव्हती.