भंडारा : अत्यंत अटीतटीच्या लढतीत भंडारा-गोंदिया मतदारसंघावर अखेर काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. बदलत्या परिस्थितीत भाजप नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. काँग्रेसने चार विधानसभेत घेतलेली आघाडी ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असलेल्या दोन विधानसभेतच भाजप वजा होणे ही भाजपसाठी चिंतनाची बाब आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> केरळमधील भाजपाचा ख्रिश्चन चेहरा मोदींच्या मंत्रिमंडळात; कोण आहेत जॉर्ज कुरियन?

लोकसभेचा निकाल जाहीर होताच आता विधानसभेचे वादळ घोंगावू लागले आहे. लोकसभेचा निकाल जाहीर होताच विधानसभेची आकडेमोड करण्यास सुरुवात झाली आहे. भंडारा गोंदिया मतदारसंघात भंडारा, साकोली, तुमसर, अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि गोंदिया असे एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत. सहापैकी भंडारा, साकोली, तुमसर आणि अर्जुनी मोरगाव या ४ विधानसभा क्षेत्रात डॉ. पडोळे यांनी, तर गोंदिया आणि तिरोडा या २ विधान सभा क्षेत्रात मेंढे यांनी आघाडी घेतली. मागील वेळीच्या तुलनेत मेंढे यांना साधारणत: एक लाख मतांचा फटका बसला. ज्यात भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मिळून सुमारे ५९ हजार मतांनी वजाबाकी झाली.

भंडारा विधानसभेत सध्या अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर, तुमसर क्षेत्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ. राजू कारेमोरे तर साकोली विधानसभेत नाना पटोले आमदार आहेत. लोकसभा निकालाअंती विधानसभानिहाय आकडेवारी बघता या तीनही विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा भाजप आणि एकंदरीतच महायुतीतील मित्र पक्षांसाठी मोठे आव्हान असणार आहे.

भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्रात सुनील मेंढे २३ हजार मतांनी मागे पडले. भंडाऱ्यात सुनील मेंढे मागे जाण्याचे मुख्य कारण भाजपचे नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकारी असल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे. शिवाय मेंढे आणि डॉ. परिणय फुके यांच्यातील अंतर्गत धुसफुसही कारणीभूत ठरली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase congress vote percentage is a danger bell for bjp zws