कराड : सण- उत्सवांच्या नावाखाली होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी कराड शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गणेशोत्सवातील गणेश मूर्तींचे आगमन, गणेश मूर्तींचे विसर्जन, तसेच ईद- ए- मिलाद या सण, उत्सवांदरम्यान, ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ५६ सार्वजनिक मंडळे व ग्रुपवर कारवाई करण्यात आली आहे.
कराडच्या नूतन पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी आणि धडक कारवाई करण्यात आली आहे.याबाबतची माहिती अशी की, गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद मिरवणुकांदरम्यान, उच्चक्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पोलिसांकडून विशेष मोहीम आखण्यात आली होती. या मोहिमेत फौजदार दीपक वागवे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने सार्वजनिक गणेश मंडळे व विविध ग्रुप (तरुणांचे समूह) यावर धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. या धडक कारवाईच्या मोहिमेत कराड शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एकूण ३३ गणेशोत्सव मंडळे आणि २३ ईद-ए-मिलाद ग्रुपवर कारवाईचा प्रस्ताव पोलिसांकडून येथील न्यायालयात सादर करण्यात आला आहे. संबंधित सार्वजनिक गणेश मंडळे आणि ईद-ए-मिलाद ग्रुपवर लवकरच न्यायालयामार्फत कडक कारवाई होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
यामध्ये ईद- ए- मिलादच्या प्रमुख ग्रुपमध्ये शाही दरबार कमिटी, तिरंगा फ्रेंड्स सर्कल, नूर मोहल्ला शांतीनगर, सेवन स्टार ग्रुप, एम. एफ. ग्रुप, रॉयल ग्रुप, सहारा फ्रेंड्स सर्कल, लब्बैक फ्रेंड्स ग्रुप आदींचा तरुणांच्या समूहांचा समावेश आहे. तर, गणेशोत्सवातील गणेश मूर्तींचे आगमन मिरवणुकीतील कारवाई करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये न्यू सत्कार गणेश मंडळ मलकापूर, श्री शिवशक्ती बाल गणेश मंडळ, महर्षी वाल्मीक गणेश मंडळ, श्री कमळेश्वर गणेश मंडळ, उदय गणेश मंडळ, श्री कला विकास मंडळ आदी सार्वजनिक गणेश मंडळाचा समावेश आहे.
त्याचबरोबर गणेश विसर्जनाच्या वेळी कारवाई झालेल्या मंडळांमध्ये अखिल भारतीय वडार समाज गणेश मंडळ, श्री युवक गणेश मंडळ, मार्केटचा राजा गणेश मंडळ, विवेकानंद गणेश मंडळ, वीर महाराणा प्रताप गणेश मंडळ, छत्रपती गणेश मंडळ, महात्मा फुले तरुण मंडळ, ओम गणेश मंडळ आदी सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश आहे. पोलिसांनी अशा प्रकारे धडक कारवाई केल्याने ध्वनिक्षेपकाचा दणदणाट आणि आवाजाच्या भिंती यांना विरोध असणाऱ्या नागरिकांनी पोलिसांच्या या कडक भूमिकेचे स्वागत केले आहे. तर, या धडक आणि कडक कारवाईत सातत्य राखून ध्वनिक्षेपकाचा दणदणाट आणि आवाजाच्या भिंती याला चाप लागणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईत निष्पक्षपणे सातत्य राहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.