कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार पी. एन. पाटील गट अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईमध्ये सदिच्छा भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हेही उपस्थित होते.
राहुल पाटील हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर बंधू राजेश पाटील यांच्यासह काँग्रेस पक्ष सोडणार, अशी चर्चा सुरू होती. सुरुवातीला ते भाजपमध्ये प्रवेश करणार, अशीही चर्चा रंगली होती. त्यात त्यांनी बदल करीत हातावर घड्याळ बांधण्याचे निश्चित केले आहे. आज अजित पवार यांची त्यांनी घेतलेली भेट पाहता पक्षांतर निश्चित झाले आहे.
कोल्हापुरात पक्ष प्रवेश
कोल्हापुरात उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत १९ किंवा २५ ऑगस्ट रोजी समारंभपूर्वक हा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती बी. एच. पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे आदी प्रमुख उपस्थित होते.