रत्नागिरी : गणेशोत्सव कालावधीत रिक्षा व बस व्यावसायिकांवर पोलीसां बरोबर आता राज्य परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या मार्फत विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. सणासुदीत यांच्या कडून होणारी चाकरमान्यांची लुट थांबवण्यासाठी आरटीओचे पथक कार्यरत राहणार आहे.
कोकणात गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी अनेक चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. या कालावधीत रिक्षा चालक व बस वाहतूकदार अवाजवी भाडे आकारणी व प्रवाशांशी उद्धट वर्तन करतात. अशा रिक्षा / बस वाहतूकदारांना चाप लावण्यासाठी आरटीओ ॲक्शन मोडवर आले आहे. याविषयी आरटीओ अधिका-यांनी बैठक घेवून अशा वहातूकदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार करण्यासाठी ८२७५१०१७७९ या व्हाट्सअप क्रमांकावर वाहनाच्या व प्रवासाच्या तपशिलासह तक्रार करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा संघटना, बस वाहतुकदार संघटना यांच्यासोबत वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस तसेच रेल्वे पोलीस यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पाडली. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर तसेच पोलीस उप निरीक्षक (वाहतूक शाखा) शरद घाग, पो.उप निरीक्षक (महामार्ग पोलीस) चंद्रशेखर जाधव, वरिष्ठ निरीक्षक रेल्वे पोलीस सतिश विभुते, विभागीय वाहतुक अधिकारी प्रमोद यादव यांच्यासह सर्व रस्ता कंत्राटदारांचे प्रतिनिधी, बस वाहतुकदार संघटना व रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. करपे म्हणाले, सर्व रिक्षा धारकांनी त्यांची वाहने रिक्षा स्टॅण्ड वर शिस्तबद्ध पध्दतीने वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेत लावावीत. तसेच अवाजवी भाडे आकारणी करणे व प्रवाशांशी कोणत्याही प्रकारचे उद्धट वर्तन करू नये, वाहन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतुक करू नये, याबाबत त्यांना सुचित करण्यात आले.
सर्व वाहन मालकांनी वाहनाची सर्व कागदपत्रे वैध आहेत, याची खात्री करावी. बस वाहनधारकांनी बसमध्ये आपत्कालीन दरवाजा, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी सुस्थितीत असल्याचे खात्री करावी. बस चालकांनी मद्यप्राशन करून बस चालवू नये. तसेच त्यांना पुरेशी विश्रांती व झोप मिळेल याची ही काळजी बस मालकांनी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
बस मालकांनी प्रवाशांकडून अवाजवी भाडयाची मागणी करू नये, याबाबत त्यांना सूचित करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांनी एसटी बस चालवताना सुरक्षिततेविषयी पुरेशी काळजी घेऊन बस चालवावी. वाहतुकीची कुठेही कोंडी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. परिवहन महामंडळाने रेल्वेच्या वेळापत्रकाशी सुसंगत वेळेत एसटी बसच्या रेल्वे स्टेशनसाठीच्या फेऱ्यांचे नियोजन करावे, अशाही सूचना श्री. करपे यांनी यावेळी दिल्या.