महाविकास आघाडीच्या राज्यभर सभा पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना जनतेचा जोरदार प्रतिसादही मिळत आहे. नुकत्याच झालेल्या छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमधील सभांनंतर आता मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात महाविकास आघाडीची सभा होणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष सभेची तयारी करण्यात व्यस्त आहेत. तिन्ही पक्षांचे स्थानिक नेते यासाठी तयारीला लागले आहेत. नुकतीच मुंबईतल्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली.
या बैठकीला शिवसेनेकडून (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब आणि काँग्रेसकडून भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. तसेच मुंबईतल्या वज्रमूठ सभेच्या पूर्वतयारीसीठी तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावलं होतं. एकीकडे नेते या सभेच्या तयारीत व्यस्त आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेचा टीझर सोशल मीडियावर जारी केला आहे.
या टीझरमध्ये मागील एका वज्रमूठ सभेतील उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणाची झलक पाहायला मिळाली. मागील एका सभेत उद्धव ठाकरे म्हणाले होते की, देश कसा चालला पाहिजे लोकशाही कशी टिकली पाहिजे यासाठी एक माणूस देशासाठी संविधान लिहू शकतो. तर इतकी मोठी वज्रमूठ, कोट्यवधी, अब्जावधी लोक त्या राज्यघटनेचं रक्षण करू शकत नाही का?
यासह, महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेची वेळ आणि स्थळाची माहिती शेअर केली आहे. १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात ही सभा होईल. सायंकाळी ५.३० वाजता सभेला सुरुवात होईल.