Manikrao Kokate Playing Rummy Video: राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे मंत्री झाल्यापासून अनेकदा वादात अडकले आहेत. कधी ते वादग्रस्त विधान करतात तर कधी विधिमंडळाच्या सभागृहातच मोबाइलवर गेम खेळताना आढळतात. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांचा मोबाइलवर गेम खेळतानाचा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. कोकाटे मोबाइलवर रमी गेम खेळत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. यानंतर विरोधकांनी कोकाटेंवर जोरदार टिकास्र सोडले आहे. तसेच आता अजित पवार गटाकडूनही यावर पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

तत्पूर्वी रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.

या घटनेवर विरोधकांनी चहुबाजूंनी टीका सुरू केल्यानंतर आता अजित पवार गटाकडून यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष, तसेच प्रवक्ते सूरज चव्हाण माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की, जाणीवपूर्क हे चालू असावे. कोकाटे मोबाइलवर काही स्क्रोल करताना त्यावर काहीतरी दिसले असावे. अशापद्धतीचे वर्तन माणिकराव कोकाटेंकडून होणार नाही, असा मला विश्वास आहे. कारण ते मोबाइल पाहताना त्यावर काहीतरी आले असावे.

सूरज चव्हाण म्हणाले, “सभागृहात त्यांनी त्यांचे काम केले असेल. तसेच जे काही झाले ते चुकीचे आहे. त्यांनी सभागृहाचा दर्जा राखला पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना समज देतील.”

दरम्यान शिवसेनेचे (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनीही यावर टीका केली आहे. ते म्हणाले, दोन शेतकरी त्यांच्या प्रश्नांसाठी लातूरहून मुंबईला चालत आले. त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला आमच्या कृषीमंत्र्यांकडे वेळ नाही. कुणाचे व्हिडीओ पैशांच्या बॅगेबरोबर दिसत आहेत. कुणी आमदार निवासात मारहाण करत आहे. तर कुणी सभागृहात मोबाइलवर गेम खेळत आहे. अमित शाह यांनी चार मंत्र्यांना डच्चू देण्यासाठी यादी बनवली, त्यात कोकाटे यांच्याही नावाचा समावेश असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

प्रहार संघटनेचे नेते, माजी आमदार बच्चू कडू यांनीही कोकाटे यांच्या वर्तनावर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, विवाह समारंभावर होणारा खर्च आणि मद्यपान केल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत, असे एकीकडे सरकारमधील लोक म्हणतात. पण, आमचे कृषीमंत्रीच जर रमीत गुंग होत असतील, तर शेतकऱ्यांचे काय भले होणार आहे. शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा हैदोस सहन करावा लागत आहे. उभे पीक उध्वस्त होताना शेतकऱ्यांना पहावे लागत आहे.

माणिकराव कोकाटे यांनी आरोप फेटाळले

मोबाइलवर खालच्या सभागृहात काय कामकाज सुरू आहे, हे पाण्यासाठी युट्यूबवर गेलो असतो सदर जाहिरात सुरू झाली आणि मी लगेच ती स्किपही केली, असे स्पष्टीकरण माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे.