Maharashtra Cabinet : सुमारे आठवडाभर चर्चेच्या विविध फेऱ्या पडल्यानंतर अखेर महाराष्ट्र सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आहे. २ जुलैला राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली होती. तसंच राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनाही शपथ देण्यात आली. आता खातेवाटप झाल्यानंतर राष्ट्रवादीला शिंदे गटाची तीन आणि भाजपाची सहा खाती देण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला नऊ मंत्रिपदं मिळाली आहेत.

अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार हे महाविकास आघाडीत अर्थमंत्री होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यानंतर जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा त्यांनी अजित पवारांवरही टीका केली होती. अजित पवार यांनी निधी वाटपात पक्षपातीपणा केला होता. शिवसेनेच्या आमदारांना निधी वाटताना दुजाभाव केल्याचं म्हटलं होतं. अशात आता अर्थखातं हे अजित पवारांकडेच आलं आहे. आपण जाणून घेऊ की राष्ट्रवादीच्या गटाला भाजपाची कोणती खाती मिळाली आणि शिंदे गटाने किती खाती सोडली?

अर्थ खातं- अजित पवारांकडे अर्थ खातं देण्यात आलं आहे. हे खातं आधी भाजपाकडे होतं आणि देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री होते. मात्र आता अजित पवार अर्थमंत्री असतील.

कृषी खातं– हे खातं नव्या खातेवाटपात धनंजय मुंडेंना देण्यात आलं आहे. ते आधी शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्याकडे होतं.

भाजपाच्या अतुल सावे यांच्याकडे असलेलं सहकार खातं आता राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आलं आहे.

भाजपाच्या रविंद्र चव्हाण यांच्याकडे असलेलं अन्न आणि नागरी पुरवठा खातं हे छगन भुजबळांना देण्यात आलं आहे.

शिवसेनेच्या संजय राठोड यांच्याकडे असलेलं अन्न आणि औषध प्रशासन खातं हे राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा अत्राम यांना देण्यात आलं आहे.

भाजपाच्या गिरीश महाजन यांच्याकडे असलेलं क्रीडा आणि युवक कल्याण खातं हे संजय बनसोडेंना देण्यात आलं आहे.

भाजपाच्या मंगलप्रभात लोढांकडे असलेलं महिला आणि बालकल्याण खातं हे राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना देण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असलेलं मदत आणि पुनर्वसन खातं हे राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांना दिलं गेलं आहे. नव्या खातेवाटपाचा विचार केला तर हे लक्षात येतं की राष्ट्रवादीला जी खाती मिळाली आहेत त्यात भाजपाकडे असलेली सहा खाती आणि शिवसेनेकडे असलेल्या तीन खात्यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cabinet ajit pawar led ncp group gets 6 minister portfolio from bjp and three form shivsena scj