मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यासंबंधी घेतलेली भूमिका तसंच रामनवमीला झालेला हिंसाचार यामुळे सध्या वातावरण तापलं आहे. त्यातच राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला असल्याचा पुनरुच्चार केला. ३ तारखेपर्यंत यांना समजलं नाही आणि देशातील कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा स्वत:चा धर्म, लाऊडस्पीकर मोठे वाटत असतील तर जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

दिल्लीमध्ये हनुमान जयंती मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर राज ठाकरेंचा जाहीर इशारा; म्हणाले “समोर जे कोणतं हत्यार…”

“विविध धर्माच्या लोकांनी एकमेकांच्या सणांमध्ये, उत्साहात, जयंतीत सहभागी झालं पाहिजे. सर्वांनी एकोपा टिकवला पाहिजे. जाती-धर्मात तेढ निर्माण होणार नाही, सगळे गुण्या गोविंदाने नांदतील असा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. हेच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सर्वांना सांगितलं आहे. म्हणूनच आपला भारत देश एकसंघ पहायला मिळतो,” असं अजित पवार म्हणाले आहेत.

राज ठाकरेंचा पुण्यात इशारा –

“फक्त हिंदू नाही तर मुस्लिमांनाही त्रास होत आहे. अनेक वर्ष हा प्रलंबित राहिलेला विषय आहे. तुम्ही जर पाच वेळा भोंगे लावणार असू तर आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा. सध्या रमजान सुरु असल्याने काही सांगायचं नाही आहे. पण ३ तारखेपर्यंत यांना समजलं नाही आणि देशातील कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा स्वत:चा धर्म, लाऊडस्पीकर मोठे वाटत असतील तर जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे,” असा इशारा राज ठाकरेंनी यावेळी दिला.

“मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोत. कोणत्याही हाणामारी नको आहे. शांतता भंग करण्याची इच्छाही नाही. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही. पण जर लाऊडस्पीकरवर लावणार असतील तर आमच्याही आरत्या त्यांना ऐकाव्या लागतील,” असं राज ठाकरे म्हणाले.

“आमच्याकडून मिरवणूक निघत असताना त्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत. दगड आम्हालाही हातात घेता येतो. समोर जे कोणतं हत्यार असेल ते आमच्याही हातात द्यायला लावू नका,” असा इशारा राज ठाकरेंनी दिल्लीतील हिंसाचारावर बोलताना दिला.