मुंबईः बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा आहे. ही परंपरा जगभर पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी पुढील कालावधीमध्ये प्रो बैलगाडा लीग सुरू करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीच्या बक्षीस वितरण सोहळ्यात शिंदे बोलत होते.

यावेळी विविध स्पर्धांतील विजेत्यांना गौरवण्यात आले. परिसरात हजारोंच्या संख्येने उपस्थित शेतकरी, रसिक आणि चाहत्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहून महाराष्ट्राच्या बैलगाडा संस्कृतीची लोकप्रियता स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांचा सन्मान, संस्कृतीचे संवर्धन आणि परंपरेला आधुनिकता देणे हेच आमचे ध्येय आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केले होते. परंपरा, श्रद्धा आणि भविष्यातील योजना शर्यतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रेरणा, रोजगार आणि आर्थिक पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. बैल हा शेतकऱ्याचा विश्वासू साथी आहे. बैलगाडा शर्यत म्हणजे मातीचा अभिमान. ती आपण जपलीच पाहिजे असे ते म्हणाले. त्यांनी पुढील काळात प्रो बैलगाडा लीग सुरू करण्याचा संकेत देत, योजनेच्या नेतृत्वाबाबत आयोजक चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कार्यसंघाचे कौतुक केले.

बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातग्रस्त कुटुंबियांना ५ लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फोर्चूनर आणि थार गाड्यांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.