Monsoon Session of Maharashtra Assembly Updates, 17 July 2023 : विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून (सोमवार, १७ जुलै) सुरू होत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात एरव्ही सत्ताधारी पक्षांना विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याची चिंता असते. परंतु यंदाच्या पावसाळी अधिवेशनाआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेलं बंड, त्यामुळे बदलेली राजकीय समीकरणं, विधान परिषदेत विरोधकांचं घटलेलं संख्याबळ यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी बिनधास्त आहेत. याउलट आपले अस्तित्व दाखवून सरकारची कोंडी करण्याचं मोठं आव्हान विरोधकांपुढे असेल. आज विधीमंडळात घडणाऱ्या घडामोडींसह राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात काय काय घडतंय याचा आढावा आपण घेणार आहोत.
Maharashtra Breaking News : महाराष्ट्राच्या विधीमंडळातील तसेच राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (रविवार, १६ जुलै) काही मंत्र्यांसह पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आज अजित पवार इतर अनेक आमदारांसह पुन्हा एकदा शरद पवार यांना भेटले. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील अनेक महत्त्वाचे नेते आणि आमदार उपस्थित होते. या भेटीत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्याशी काय चर्चा केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
जयंत पाटील म्हणाले, ती सगळी मंडळी शरद पवार यांना भेटली. त्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. शरद पवार यांना भेटून काल नऊ मंत्र्यांनी जी विनंती केली होती त्याच विनंतीचा आज पुन्हा एकदा त्यांनी पुनरुच्चार केला. शरद पवार यांनी त्यांची विनंती ऐकून घेतली. मला इथं नमूद करायचं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधात आहे. आमचे सर्व आमदार आज अधिवेशनावेळी विरोधी पक्षांबरोबरच बसले होते. तिथेच त्यांची व्यवस्था करण्यास सांगितलं आहे.
बंगळुरू येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे बंगळुरुत दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री, आमदार, अजित पवार, मी आणि सुनील तटकरे येथे (वाय. बी. सेंटर) आलो होतो. कालही आम्ही शरद पवार यांची भेट घेतली होती. पंरतु काल केवळ मंत्रीच उपस्थित होते, बरेच आमदार नव्हते. अधिवेशनासाठी बरेच आमदार आज मुंबईत उपस्थित होते. हे सगळे जण आणि आम्ही आज शरद पवार यांना भेटायला इथे आलो. सर्व आमदारांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला. पक्ष एकसंघ राहावा यासाठी साहेबांनी विचार करावा अशी विनंती करून आम्ही इथून जातोय.
शरद पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी पटेल म्हणाले, अजित पवार आणि विधीमंडळातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्व नेते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आले होते. पक्ष एकसंघ राहावा यासाठी शरद पवार यांनी विचार करावा, अशी विनंती आम्ही केली. त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. परंतु त्यांच्या मनात काय आहे ही मी सांगू शकणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी आज जाहीर केली. या कार्यकारिणीवर सुनिल विजय गव्हाणे, इम्रान युनूस शेख, काशिनाथ संभाजी जगताप, प्रशांत लक्ष्मण सपकाळ, देवेंद्र सहदेव तायडे, मयूर भरत जाधव, काशिनाथ विठ्ठलराव नखाते, राजन गोपाळकृष्णन नायर, शिलाताई संदीप भोंडवे या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभेच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सभागृहाचं कामकाज सुरू होताच विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्या मंत्र्यांचा परिचय करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिलंच नाव अजित पवार यांचं घेतलं. शिंदेंनी अजित पवारांचा परिचय करून देताना “उपमुख्यमंत्री व वित्त” असा उल्लेख केला आणि ते थांबले. हे पाहून बाजूलाच बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना “नाव सांगा”, असं म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचं नाव घेतलं. त्यानंतर अजित पवारांनी उभे राहून सर्वांना नमस्कार केला. त्याचवेळी अजित पवार बसत असतानाच समोर विरोधी बाकांवर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मिश्किल शब्दांत टोला लगावला. पाटील म्हणाले, “त्यांची-आमची जुनी ओळख आहे”, जयंत पाटलांचं वाक्य ऐकताच सभागृहात हास्याची लकेर उमटली. तशीच ती अजित पवारांच्या चेहऱ्यावरही दिसून आली!
आदित्य ठाकरे म्हणाले, एक वर्षापूर्वीची जी ओरिजनल गद्दारांची बॅच होती, त्यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती, परंतु आज विधानसभेत त्यांचे चेहरे पाहून जे समजायचं होतं ते समजलं आहे. त्यांच्या मागून काही लोक विस्तार करून आले, त्यांना मंत्रीपदंही मिळाली, पण यांचा (शिंदे गट) काही विस्तार होणार नाही. ओरिजनल गद्दारांना मंत्रीपदं मिळणार नाहीत, यांना खाती मिळणार नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार होणं शक्य नाही. ते आता कधीच मंत्री होणार नाहीत.
पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. त्यानंतर विधानसभा स्थगित करण्यात आली. दरम्यान, विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे.
दिवंगत खासदार आणि माजी मंत्री गिरीश भालचंद्र बापट, दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ नारायण धानोरकर, माजी आमदार शंकरराव लिंबाजीराव वाकुळणीकर (कोळकर), बाबुरावजी जसुजी वाघमारे आणि माजी आमदार रामचंद्र पुनाजी अवसरे यांच्या निधनानंतर विधानसभेत शोकप्रस्ताव सादर करण्यात आला.
संजय शिरसाट, समीर कुनावर, यशवंत माने, अमित जनक यांची विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मंत्री, आमदार विधानभवनात दाखल होऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदार आणि मंत्री सत्ताधारी बाकावर बसल्याचं पाहायला मिळालं.
१. मंत्र्यांचा परिचय
२. अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे :-
मुख्यमंत्री :- २०२३ चा अध्यादेश क्रमांक ३ प्रादेशिक नियोजन व अध्यादेश, २०२३ – महाराष्ट्र नगररचना (सुधारणा)
सहकार मंत्री :- (क) सन २०२३ चा अध्यादेश क्रमांक २ सहकारी संस्था (सुधारणा) अध्यादेश, २०२३ महाराष्ट्र
(ख) सन २०२३ चा अध्यादेश क्रमांक ५ – महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२३
ग्रामविकास मंत्री : (क) सन २०२३ चा अध्यादेश क्रमांक १ – महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, २०२३
(ख) सन २०२३ चा अध्यादेश क्रमांक ६ – महाराष्ट्र (ग्रामपंचायतींच्या, जिल्हा परिषदांच्या व पंचायत समित्यांच्या विवक्षित निवडणुकांकरिता) वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविणे अध्यादेश, २०२३
उद्योग मांत्री : सन २०२३ चा अध्यादेश क्रमाांक ४ – महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुांतवणूक सुविधा अध्यादेश
३ : सन २०२३-२०२४ च्या पुरवणी मागण्या सादर करणे
४ : विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधानपरिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राष्ट्रपती / राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करणे
५ : अध्यक्षांनी, सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे
६ : शासकीय विधेयके :
पुर: स्थापनार्थ :-
(१) सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी) सुधारणा) विधेयक, २०२३
(२) सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ – महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, २०२३
(३) सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक २० महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना (सुधारणा) विधेयक, २०२३
(४) सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक २१- महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारणा) विधेयक, २०२३
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पक्षप्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विरोधी बाकांवर बसण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून अनिल पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद म्हणून पक्षातील आमदारांना व्हीप जारी केला आहे. त्यामुळे आता कोणते आमदार कुठे बसणार आणि कुणाला कुणाचा व्हीप लागू होणार? हा वाद पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे.
भाजपबरोबर जाणार नाही; राष्ट्रवादीचे बंडखोर नेते भेटल्यानंतर शरद पवारांची स्पष्टोक्ती
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे सर्व मंत्री व नेतेमंडळींनी सर्वेसर्वा शरद पवार यांची रविवारी भेट घेतली. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करीत यातून मार्ग काढण्याची विनंती त्यांनी पवारांना केली. मात्र या आवाहनावर पवार यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. उलट त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी भाजपबरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट केले.