Maharashtra News Today, 12 September 2025 : मुंबईत मातोश्री या शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पक्षाच्या आमदार व मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबरच्या संभाव्य युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) सातत्याने भेटी होत असताना आज नाशिकमध्ये शिवसेना (उबाठा) व मनसेने संयुक्त मोर्चाची हाक दिली आहे. नाशिकमधील नागरी समस्यांविरोधात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरणार आहेत.
भारतीय जनता पार्टीने येत्या मंगळवारी मुंबईत विजय संकल्प मेळावा आयोजित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून आगामी महानगरपालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी केली जाणार आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासंबंधित राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की कायद्याच्या चौकटीत हा शासन निर्णय जारी करण्यात आला असून ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना जातप्रमाणपत्र मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला, “हा शासन निर्णय सरकारने बदलला तर एकाही नेत्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले, “आपल्या देशात लोकशाही आहे, जरांगेशाही नाही. जरांगेशाही येणं अशक्य आहे.”