Maharashtra Politics Updates : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माजी आमदार राजन साळवी यांच्याबाबतही आमदार किरण सामंत यांनी मोठा दावा केला आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे काही खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी सूचक भाष्य देखील केलं आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही सुरूच आहेत. तसेच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. याबरोबरच तसेच मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्याबाबत कौटुंबीक न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. तसेच पुण्यासह राज्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यासह राजकीय व इतरही महत्त्वाच्या घडामोडीची अपडेट आपण लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमांतून जाणून घेऊयात…

Live Updates

Marathi News Live Update Today | आजच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

11:40 (IST) 7 Feb 2025

एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाला संगीताचा नजराणा, लोकनाथ – एकनाथ, अनाथांचा नाथ एकनाथ गाणी पुन्हा प्रकाशझोतात

एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जुन्या गाण्यांच्या ध्वनिचित्रफिती पुन: प्रकाशित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी ‘एकनाथ तो लोकनाथ’ हे नवे गाणेही प्रदर्शित होणार आहे.

वाचा सविस्तर…

11:28 (IST) 7 Feb 2025

अमेरिकेने पाठवलेल्या भारतीयांबाबत पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारणार का? संजय राऊतांचा सवाल

“भारतीयांना ज्या पद्धतीने अमेरिकेतून पाठवण्यात आलं. त्यांना बेड्या घातल्या होत्या. भारतीय भूमीवर उतरवलं, म्हणजे विमानातून भारतीय भूमीवर उतरवतानाही त्यांच्या बेड्या काढल्या नाहीत. हे आपल्या कायद्याचे उल्लंघन आहे. अमेरिकेतील प्रशासनाने आमच्या अमृतसरमध्ये उतरून आमचा कायदा हातामध्ये घेतला. आमच्यासाठी ते गुन्हेगार नाहीत, त्यांच्यासाठी असतील. विमानातून उतरताना त्यांच्या बेड्या काढणं आवश्यक होतं, पण अमेरिकेच्या प्रशासनाने त्यांच्या बेड्या काढल्या नाहीत. आता पंतप्रधान मोदी हे अमेरिकेत जात आहे. मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पंतप्रधान मोदी याबाबत प्रश्न उपस्थित करणार आहेत का?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

10:22 (IST) 7 Feb 2025

ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार? “राज्यात ऑपरेशन टायगर होणार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय राठोड यांना विचारलं असता ते म्हणाले, “चर्चा जोरात सुरु आहे आणि’ऑपरेशन टायगर’ होणार देखील आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच सहा खासदारांचं मन ओळवण्यात आलं अशी चर्चा आहे असं विचारलं असता संजय राठोड म्हणाले, “आता आमचे सहकारी उदय सामंत हे देखील माध्यमांशी बोललेत. खऱ्या अर्थाने ठाकरे गटातील आमचे काही सहकारी आहेत ते आम्हाला सातत्याने बोलतात. आम्ही केलेला उठाव आणि त्यानंतर आलेलं यश हे सर्वांना पटलेलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ योग्य वेळी होईल”, असं मंत्री संजय राठोड यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.

10:21 (IST) 7 Feb 2025

‘काही गोष्टी राखून ठेवल्यात योग्य वेळी…’, उदय सामंत यांचं सूचक विधान

राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ राबवायचं असेल तर ठाकरे गटाचेच लोक आमच्याकडे येत आहेत. मग त्यांना कदाचित गुवाहाटीत घेऊन जाऊ, पण आम्हाला गुवाहाटीला जाण्याची आवश्यकता नाही. सक्षम महाराष्ट्र कसा असतो हे गेल्या अडीच वर्षांत जनतेने पाहिलेले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेकजण शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

'काही गोष्टी राखून ठेवल्यात योग्य वेळी सर्व सांगणार', उदय सामंत यांचं सूचक विधान, (फोटो-संग्रहित छायाचित्र)