Maharashtra Assembly Floor Test updates :महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर ठरावाच्या विरोधात ९९ मतं पडली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली. रविवारी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर सभापती झाल्यामुळे शिंदे सरकारने पहिला अडथळा दूर केला आहे. गेले १० दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्याचवेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत.
दरम्यान, रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली होती. बहुमत सिद्ध करण्याच्या रणनीतीबाबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत शिंदे गट आणि भाजपाचे आमदार उपस्थित होते. आपल्याला ४० बंडखोर शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा शिंदेंचा दावा आहे. तर १६६ मतांनी सरकार बहुमत सिद्ध करेल, असा दावा फडणवीस यांनी केला होता.
Maharashtra Floor Test : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून शिंदे सरकारनं पहिला विजय मिळवला आहे. Read in English
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघात जाणार आहेत. आंनद नगर चेक नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जल्लोषात ठाण्यात स्वागत करण्यात येणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचं समाधीस्थान असलेल्या शक्ती स्थळाचे एकनाथ शिंदे दर्शन घेतील. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या निवास्थानी जातील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणीला सामोरे गेल्यानंतर विधानभवन येथे पत्रकार परिषदेला घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करतील. शिवाजी पार्क मधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत.
वहुमत चाचणीसाठी भाजपाचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. भाजपा सेना युतीचा विजय असो अशा घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज(सोमवार) दिल्लीत माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजपा यांच्यावर टीका केली. “शिवसेना म्हणजे काही युक्रेन नाही, असा कोणताही गट शिवसेनेला ताब्यात घेऊ शकत नाही.” असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे गटाला आव्हान देखील दिलं. याचबरोबर, “हे काय रामशास्त्रींचं राज्य नाही, ही राजकीय चढाओढ आहे.” असं म्हणत भाजपावर देखील त्यांनी निशाणा साधला. वाचा सविस्तर बातमी…
शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी १६ आमदारांच्या निलंबनाची मागणी सभापतींकडे केली आहे. आमदारांना निलंबनाची नोटीस बजावली जाईल, अशी पुष्टी सभापती कार्यालयाने दिली आहे.
Maharashtra | Bharat Gogawale, Chief whip of Shiv Sena (Eknath Shinde faction) has given a petition to the Assembly Speaker for the suspension of 16 MLAs of the party for violation of whip. The 16 MLAs will be issued notice for suspension, confirms the Speaker's office.
— ANI (@ANI) July 4, 2022
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना खरी आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की भारताच्या राजकारणामध्ये २८० निर्माण झाल्या पण दोनच सेना टिकल्या. भारतीय सेना आणि शिवसेना. त्यामुळे दोनच सेना या कायम राहतील, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आज विधानमंडळात मतदान झालं. त्यामध्ये राहुल नार्वेकर १६४ मतं घेऊन निवडून आले. आमचे दोन सदस्य आजारी असल्याने दोन सदस्य आले नाहीत. एकूण १६६ लोकं आमच्या युतीच्या पाठिशी भक्कमपणे आहेत. सोमवारी विश्वासदर्शक ठराव आम्ही मांडत आहोत. हा ठरावही भक्कम बहुमताने मंजूर होईल हा मला विश्वास आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
भाजपाचा मुख्यमंत्री न झाल्याने भाजपाच्या आमदारांनाही शिंदे-फडणवीस सरकार हे आपले वाटत नाही. त्याचा परिणाम या सरकारच्या स्थैर्यावर होणार आहे. ही सर्व राजकीय परिस्थिती पाहता शिंदे सरकार कोसळल्यानंतर विधानसभेची निवडणूक होऊ शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा, असा संदेश शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा मोठा गट गेला असला तरी त्यांच्यात सर्व आलबेल नाही. अंतर्गत नाराजी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिपद मिळेल, पण अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अंतर्गत नाराजी वाढेल. त्यातून एकनाथ शिंदे यांचे सरकार कधीही कोसळू शकते, असे भाकीत शरद पवार यांनी वर्तवले आहे.
राज्यात नव्याने स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार केव्हाही कोसळू शकते, असे भाकीत वर्तवत मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत दिला. वाचा सविस्तर….
रविवारी सभागृहात सभापतींची निवड झाली, त्यात नार्वेकर विजयी झाले. त्यांना १६४ मते मिळाली. यामध्ये भाजपाचे 104, शिंदे गटाचे ३९, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे १, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे २, राष्ट्रीय समाज पक्षाचे १, बहुजन विकास आघाडीचे ३ आणि जन स्वराज्य शक्तीच्या १ आमदारांचा समावेश आहे. याशिवाय १३ अपक्षांचाही पाठिंबा त्यांना मिळाला.
उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, विश्वास दर्शक ठरावाच्या एक दिवस आधी, महाराष्ट्र विधानसभेच्या नवनियुक्त अध्यक्षांनी रविवारी रात्री शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांना पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदावरुन हटवले. सभापती राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात शिंदे यांची सेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असून ठाकरे गटातील सुनील प्रभू यांच्या जागी भरत गोगावले यांची शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास २८८ सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे १०६ आमदार आहेत. तर एकनाथ शिंदे यांना ३९ सदस्यांचा पाठिंबा आहे. शिवसेनेच्या एका आमदाराच्या निधनानंतर त्यांची विधानसभेची सदस्य संख्या २८७ वर आली आहे. विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी १४४ चा आकडा पार करावा लागेल.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही गट प्रथमच समोरासमोर आले होते.