Maharashtra Politics Top 5 Political Statements : राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आज गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाबाबत महत्वाचं भाष्य केलं. तसेच गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांना देशाचे पंतप्रधान होण्यात रस असल्याचा टोला लगावला आहे. दरम्यान, यासह आज दिवसभरातील पाच महत्वाची राजकीय विधाने काय आहेत? ते जाणून घेऊयात.

धंगेकर-मोहोळांमधील वादावर फडणवीसांनी काय म्हटलं?

रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “काहीही भूमिका घेण्याचं कारण नाही. अनेक लोक निवडणुका जवळ आल्या की प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. हा मुद्दा एक बिल्डर्स आणि जैन बांधवांमधील आहे. त्यात आम्ही जी भूमिका घ्यायची ती घेतली आहे. जैन समाजाच्या भावना समजून घेत या प्रकरणात जैन समाजाच्या मनाप्रमाणेच निर्णय होईल असा प्रयत्न आम्ही करत आहोत. मात्र, विनाकारण मुरलीधर मोहोळ यांचं नाव त्यामध्ये घेण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत, पुण्याच्या जनतेला सर्व समजत आहे”, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

‘फडणवीसांना देशाचे पंतप्रधान होण्यात रस’ : हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सपकाळ म्हणाले की, “फडणवीस हे अत्यंत कुचकामी गृहमंत्री ठरले आहेत. त्यांच्या कार्यकाळात राज्यात महिलांवरील अत्याचार, कोयता गँग, खोक्या संस्कृती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, कारण सध्या फडणवीस गडचिरोलीच्या खाणी कोणाला वितरित करायचा आणि देशाचे पंतप्रधान कसं होता येईल हा खटाटोप करत आहेत”, असं हर्षवर्धन सपकाळानी म्हटलं आहे.

“या नाटकाचा तिसरा अंक…” : रवींद्र धंगेकर

पुणे शहरातील जैन समाजाच्या बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर हे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर दररोज नवनवे आरोप करत आहेत. यावर आज धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली. रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं की, “त्यांच्या नाटकाचा पहिला अंक संपला. आता दुसरा अंक सुरू होत आहे. पहिल्या अंकात गोखले ट्र्स्टकडून मेल आला. यांच्या नाटकाचा तिसरा अंक येण्याआधीच म्हणजेच दुसऱ्या अंकात सगळं प्रकरण संपेल. ते लोक (मोहोळ व गोखले) तिसरा अंक येऊ देणार नाही अशी मला आशा आहे. कारण तिसरा अंक आला तर त्यांच्या राजकीय जीवनाची चिरफाड होईल. ती चिरफाड होऊ नये यासाठी त्यांनी सावध भूमिका घेतली असेल.”

‘भाजपा कार्यालय राफेलच्या वेगाने…’ : संजय राऊत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज (२७ ऑक्टोबर) मुंबई दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते दक्षिण मुंबईत महाराष्ट्र भाजपाच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजन पार पडलं. यावरून शिवसेनेच्या (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नेत्यांनी सरकारवर आरोप केले. तसेच हे भाजपा कार्यालय बांधण्यासाठी जमीन बळकावल्याचा आरोपही केला. संजय राऊत म्हणाले, “मुंबईतलं मराठी भाषा भवन रखडलं, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल सरकार दरबारी पडून आहे. मात्र, भाजपा कार्यालयासाठी वेगाने सूत्र हलली. मरीन लाइन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलेलं नाही. भूमिपूजन होऊनही मराठी भाषा भवन अडकून पडलं. मात्र, आज केंद्रीय गृहमंत्री मुंबईत येऊन भाजपाच्या पंचतारांकित कार्यालयाचं भूमिपूजन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल अजून हलली नाही. भाजपाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल राफेलच्या वेगाने हलली. हे सगळं इतक्या वेगानं कसं झालं याचं रहस्य त्याच जमिनीखाली दडलं आहे.”

“भाजपाचं कार्यालय कार्यकर्त्यांसाठी मंदिरापेक्षा कमी नाही”, अमित शाह

गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपाच्या मुंबईतील नव्या कार्यालयाचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्रातील विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस शुभ असून भाजपाचं कार्यालय हे आमच्या कार्यकर्त्यांसाठी मंदिरापेक्षा कमी नाही, असं अमित शाह यांनी म्हटलं. अमित शाह म्हणाले की, “आज सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी शुभ दिवस आहे. कारण आज महाराष्ट्र भाजपाच्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं. आजपासून महाराष्ट्र भाजपा एक नवी सुरूवात करत आहे. जेव्हा भाजपाची स्थापना झाली तेव्हापासून ते आज २०२५ पर्यंत भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांपासून ते सर्व नेत्यांपर्यंत सर्वांना माहिती आहे की कार्यालय हे आपल्यासाठी एक मंदिर असतं. बाकीच्या सर्व पक्षांसाठी कार्यालय हे एक कार्यालय असेल. पण भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी भाजपाचं कार्यालय हे मंदिरापेक्षा कमी नाही”, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.