सावंतवाडी : रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी) महायुतीचे धोरण निश्चित झाले असले तरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र यावर अजूनही चर्चा सुरू आहे. यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांमध्ये मोठी खदखद आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. महायुती झाल्यास असंख्य इच्छुकांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपचा कणकवलीत आज प्रचाराचा नारळ
महायुतीच्या चर्चेला गती मिळाली असतानाच, दुसरीकडे कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप आज प्रचाराचा नारळ फोडणार आहे. यामुळे महायुतीच्या धोरणाआधीच भाजपने आपली तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ले आणि मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करतील आणि महायुती झाल्यास माघार घेतील असा एक मतप्रवाह असल्याची चर्चा आहे. बंडखोरी रोखण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीत ठाकरे शिवसेनेचा पराभव करण्याच्या उद्देशाने हा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
मात्र, आठ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवार थांबायला तयार नाहीत. महायुती झाल्यास आपला ‘गेम’ होईल, अशी भीती अनेक इच्छुकांना वाटत आहे.
आमदार दीपक केसरकर यांना अपेक्षा
महायुतीच्या धोरणाबाबत आमदार दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत माहिती दिली. ”नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीचे धोरण अजूनही ठरलेले नाही. मात्र, आज, शुक्रवारी दुपारपर्यंत महायुतीच्या धोरणाबाबत अंतिम निर्णय होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी बुधवारी रात्री पालकमंत्री नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत बैठक झाली आहे असे त्यांनी सांगितले.
बैठकांचा जोर; निर्णयाची उत्सुकता
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ले आणि मालवण नगरपरिषद तसेच कणकवली नगरपंचायत निवडणुकीत महायुती झालीच पाहिजे, अशी स्थानिक नेत्यांकडून जोरदार मागणी होत आहे. खासदार नारायण राणे यांनी चर्चा होईल सांगितल्यानंतर, काल, बुधवारी बैठ झाली. महायुतीची शक्यता असल्याने अनेक इच्छूक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात फिरून प्रचार थांबविल्याचेही बोलले जात आहे.
