शालेय शिक्षणासाठी नातेवाईकाच्या घरी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि त्यात जान्माला आलेल्या मुलाचे पितृत्व नाकारणा-या नराधमाला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून तब्बल २० वर्षांची सक्तवसुली आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्यात पीडित मुलगी आणि तिची आई दोघीही न्यायालयात साक्ष देताना सरकार पक्षाच्या विरोधात फितूर झाल्या होत्या. मात्र तरीही वैद्यकीय पुरावे आणि तपासाच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता शिरभाते यांनी आरोपी संतोष लक्ष्मण चव्हाण (वय ३५) यास कठोर शिक्षा सुनावली.
हेही वाचा >>> नाशिकमधील ३२ वर्षांच्या महिलेकडून कल्याणच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण
अक्कलकोट तालुक्यात घडलेल्या या खटल्याची माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी २०१५ सालापासून शालेय शिक्षणासाठी नातेवाईक असलेल्या आरोपी संतोष चव्हाण याच्या घरात राहात होती. दरम्यान, पोटात दुखू लागल्यामुळे तिला पुण्यात ससून सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले असता ती गरोदर असल्याचे दिसून आले. तिच्यावर संतोष चव्हाण यानेच लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. मात्र नंतर पीडित मुलगी आणि तिची आई कोणालाही न सांगताच ससून रूग्णालयातून निघून गेली होती. बंडगार्डन पोलिसांनी दाखल गुन्हा अक्कलकोट तालुक्यात घडल्यामुळे अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात वर्ग केला.
हेही वाचा >>> अकोला : मन नदीत दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू
अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी पीडित मुलीचा शोध घेऊन तिला सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल केले असता पीडित मुलीने मुलाला जन्म दिला. नवाजात बाळाची आणि आरोपीची डीएनए चाचणी केली असता त्यात नवजात बाळाचा पिता आरोपी संतोष चव्हाण हाच असल्याचे निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक सी. बी. भरड यांनी तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारतर्फे सहायक सरकारी वकील प्रकाश जन्नू यांनी चार साक्षीदार तपासले. परंतु पीडिता आणि तिची फिर्यादी आई याच फितूर झाल्या. तथापि, नवजात मूल आणि आरोपीचा डीएनए चाचणीचा सकारात्मक अहवाल, बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार आणि पोलीस तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीतर्फे ॲड. इस्माईल शेख यांनी बाजू मांडली.