Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंतरवली सराटी या ठिकाणी उपोषण सुरु केलं आहे. मध्यरात्रीपासून उपोषण सुरु करण्यात आलं आहे. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह आरक्षण द्या असं मनोज जरांगेंचं ( Manoj Jarange ) म्हणणं आहे. तसंच ओबीसीतून आरक्षणासाठीच ते आग्रही आहेत. याआधीही त्यांनी उपोषण केलं, सरकारशी चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. आता पुन्हा एकदा त्यांनी उपोषण सुरु केलं आहे. ज्यामुळे महायुतीच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. मनोज जरांगे यांनी आत्तापर्यंत पाचवेळा जे उपोषण केलं त्यातून ठोस असा तोडगा निघालेला नाही. सरकारने त्यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यातून काहीही सकारात्मक निर्णय अद्याप झालेला नाही असं मनोज जरांगेंचं ( Manoj Jarange ) म्हणणं आहे.

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन उपोषण सुरु

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. राज्यभरातून मराठा समाज आंदोलनस्थळी एकवटला आहे. मनोज जरांगे ( Manoj Jarange ) हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. मागच्या दीड वर्षापासून त्यांनी आरक्षणाचा लढा उभा केला आहे. मनोज जरांगे म्हणाले, “आता सरकारला शेवटची संधी आहे. सरकार आम्हाला जाणूनबुजून आरक्षण देत नाही, मात्र आम्ही ते घेतल्याशिवाय शांत बसणार नाही.”

हे पण वाचा- Manoj Jarange on Reservation: भाजपामधील माकडं, जरांगेंची बोचरी टीका

सोमवारी काय म्हणाले होते मनोज जरांगे?

मनोज जरांगे यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये मराठा, कुणबी एक आहेत, असा जीआर लवकरात लवकर काढा. तसेच हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करा. आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा. तुम्ही या किंवा येऊ नका. आपण आपली प्रक्रिया राबवत असतो, कोणी या म्हणून आंदोलन नसते, फूट पाडणे त्यांचं कामाचं आहे, मला राजकारणाकडे जायचं नाही, आमच्या व्याखेप्रमाणे अंमलबजावणी करा, तिन्ही गॅझेट लागू करा, शिंदे समितीने २४ तास काम केलं पाहिजे, अशी मागणीही मनोज जरांगेंनी ( Manoj Jarange ) केली होती.

आम्हाला निवडणुकीशी काही घेणंदेणं नाही

“मी आंदोलन करतो, कोणाची वाट बघत नाही, निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही. राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही, आमची अंमलबजावणी करा, नंतर बोंबलू नका. सरकारने आरक्षण दिले नाही तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. भाजपमधील काही माकडं आहेत त्यांना सांगा की मनोज जरांगे फक्त आरक्षणाच्या मागणीसाठी बसलाय”, असं मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले.