मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमधील सभेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यावर एमआयएम पक्षाची पहिली प्रतिक्रिया आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील टीकास्तर सोडलं आहे. विशेषत: राज ठाकरेंवर दाखल गुन्ह्यामध्ये जी कलमं लावण्यात आली आहेत, त्या कलमांविषयी जलील यांनी भूमिका मांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सौम्य कलमं लावल्याचा जलील यांचा दावा

राज ठाकरेंच्या सभेप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये अत्यंत सौम्य कलमं लावण्यात आल्याचं जलील म्हणाले आहेत. “राज ठाकरे यांच्यावर १५३, ११६, ११७, १७५ ही कलमं लावण्यात आली आहेत. कायद्याच्या जाणकारांच्या मते ही खूप सामान्य कलमं आहेत. यात सहज जामीन मिळू शकेल. भादंवि १२३ पेक्षा भादंवि १५३ अ लावलं असतं, तर योग्य झालं असतं. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणे हाच त्या सभेचा उद्देश होता. हे फार गंभीर आहे. एखाद्या नेत्याने स्टेजवर उभं राहून कुठेतरी एका कोपऱ्यात गडबड झाली तर त्यांना तिथेच मारा असं सांगणं चुकीचं आहे. तिथे कुणाला मारलं असतं काही झालं असतं तर कोण जबाबदार असतं?” असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे.

मुस्लीम समाजाला शांततेचं आवाहन

यावेळी बोलताना जलील यांनी कायद्यावर विश्वास असून मुस्लीम समाजाला शांततेचं आवाहन केलं आहे. “मी लोकांना म्हणालो होतो की याबाबत काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही. ज्या प्रकारे राज ठाकरेंनी भाषणात शब्दांचा वापर केला होता ते निंदनीय होतं. मी लोकांना म्हणालो होतो की रस्त्यावर येऊन काहीही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.आपण प्रशासनावर विश्वास ठेऊ”, असं ते म्हणाले. “चला एकदा होऊन जाऊ द्या, असं म्हणणं म्हणजे तुम्ही लोकांना उद्युक्त करत होते. कोणत्या शब्दांचा कसा वापर करायचा हे समजून घेणं ही तुमची जबाबदारी आहे”, असं देखील जलील म्हणाले.

MNS Aurangabad Sabha: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औंरगाबादमध्ये गुन्हा दाखल

“नवनीत राणांपेक्षा राज ठाकरेंनी वेगळं काय केलंय?”

नवनीत राणांप्रमाणेच राज ठाकरेंवर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा, असं जलील म्हणाले. “मी नवनीत राणांचं समर्थन करत नाही. पण नवनीत राणा जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा पठणाचा इशारा देतात, तेव्हा त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. मग राज ठाकरेंनी वेगळं असं काय केलं आहे? याचं सरकारने मला उत्तर द्यावं. राज ठाकरेंविरुद्ध इतकी साधी कलमं का लावली आहेत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय का की माझा भाऊ आहे. मी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल करू? राष्ट्रवादीला असं वाटतंय काे की राज ठाकरेंसोबत भविष्यात जावं लागलं, तर त्यासाठी आत्ता त्यांच्यावर गंभीर कलमं लावली जाऊ नयेत? तुम्ही दाखवण्यासाठी काहीतरी थातुरमातुर कलमं लावली आहेत असं राज्यातल्या जनतेला वाटत आहे”, असं जलील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mim imtiyaz jaleel targets cm uddhav thackeray on raj thackeray aurangabad rally pmw