धवल कुलकर्णी
मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलंय. “आपल्याला कमलनाथ यांच्या कर्तुत्वावर विश्वास असून ते एखादा चमत्कार घडून सरकारला वाचवू शकतात,” असं सूचक विधान केलं आहे.
“कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांचा विश्वास असून त्यामुळे ते एखादा चमत्कार करू शकतात. कमलनाथवर माझा भरोसा आहे. आज नाहीतर उद्या ते काय करतील हे दिसेल,” असे पवार म्हणाले. ते मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते.
निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर संघटनेमध्ये लगेचच जबाबदारी द्यावी, अशी काँग्रेसमधून भाजपवासी झालेले ज्योतिरादित्य शिंदे यांची इच्छा होती. अशी टोकाची भूमिका कोणी घेतल्यास पक्षाला दोष देता येणार नाही.
मात्र मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात कुठला प्रयोग होऊ शकणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. महाविकास आघाडीच्या सरकारला त्यांच्या शंभर दिवसाच्या कामगिरीबाबत आपण शंभर टक्के मार्क देऊ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कारकीर्दसुद्धा उत्तमपणे सुरु आहे. काँग्रेसकडे नेतृत्व आणि कर्तृत्व आहे आणि पक्षाला भवितव्य सुद्धा आहे.
महाविकास आघाडीच्या चौथ्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री फौजिया खान अर्ज भरणार होत्या. मात्र तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीमध्ये यावर चर्चा होऊन या जागेबाबत उद्यापर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे.
भीमा कोरेगाव दंगलींबाबत स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम स्थापन करावी, या आग्रहावर आम्ही कायम आहोत. तसेच मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीवर सुद्धा आम्ही ठाम आहोत. मात्र मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीमध्ये कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.