राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत पुण्यातील ससून रुग्णालयातील समस्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला. पुण्यातील ससून रुग्णालयातील भ्रष्ट्राचाराच्या मुद्यांवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी सरकारला धारेवर धरले. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही काही प्रश्न ससून रुग्णालयावरून केले. ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा झालाय का? असा सवाल विरोधकांनी सरकारला विचारला. ससून रुग्णालयातील प्रश्नांवरील चर्चेदरम्यान विधानसभेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. अनिल देशमुख यांनी प्रश्न विचारत पेशंट म्हणून ससूनमध्ये जा, असा सल्ला हसन मुश्रीफ यांना दिला. त्यावर “मी व्यायाम करून वजन कमी करेन”, अशा मिश्किल शब्दांत हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवींद्र धंगेकर काय म्हणाले?

“मी ससून रुग्णालयात आठवड्यामधून दोन वेळा भेट देतो. ससून रुग्णालयाचं बजेट हे आपल्या सर्वात नामवंत रुग्णालयाचं जेवढं बजेट असेल तेवढं बजेट आहे. मात्र, असे असूनही अनेक रुग्णांना त्या ठिकाणी सुविधा मिळत नाहीत. ससून रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून अनेक घटना समोर आल्या आहेत. मग मी ससून रुग्णालयात चाललंय काय? असा प्रश्न पडतो. आज पुणे महापालिकेला आरोग्य प्रमुख नाही. मग ससून रुग्णालयातील कार्यभार कधी सुधारेल?, पुण्याला आरोग्य प्रमुख कधी मिळेल?”, असे सवाल रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत विचारले.

हेही वाचा : बहिणीला विधानपरिषद मिळाली, भावाला राज्यसभा मिळणार का? जानकरांचं सूचक विधान; म्हणाले, “काळजी…”

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

यावर उत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले, “मी सर्व लोकप्रतिनिधींना ससून रुग्णालयाच्या भेटीसाठी घेऊन जाईन. संपूर्ण ससून रुग्णालयाची व्यवस्था कशी चांगली आहे हे दाखवणार आहे. आता त्यांनी विचारलं की, डॉ. ठाकूर यांची बदली का केली नाही. मी याबाबत याधीच सांगितलं होतं की, याबाबत मागेच त्यांची समितीने चौकशी केली. समितीने बदली करण्याचे सूचवल्यानंतर ठाकूर यांची बदली केली”, असे उत्तर हसन मुश्रीफ यांनी दिलं. त्यानंतर अनिल देशमुख यांनी काही प्रश्न विचारले.

अनिल देशमुख काय म्हणाले?

“ससून रुग्णालयात मधल्या काळात एक व्यक्ती उंदीर चावल्याने मृत्यू झाला होता, अशी माहिती समोर आली होती. आता त्या ससून रुग्णालयामध्ये उंदराचा काही बंदोबस्त केला आहे का? त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की, ससून रुग्णालयामध्ये बेरिएट्रिक सर्जरी (वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया) करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार का? आणि तिसरा प्रश्न की, पेशंट म्हणून आपण (हसन मुश्रीफ) तेथे जाणार का?”, असे प्रश्न अनिल देशमुख यांनी विधानसभेत विचारले.

देशमुखांच्या प्रश्नावर मुश्रीफांचं मिश्किल उत्तर

अनिल देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नांवर हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं. मुश्रीफ म्हणाले, “अध्यक्ष महोदय मी घाबरलो का? की, बहुतेक असे वजन कमी केलेल्या लोकांच्याही तक्रारी आल्या. त्यामुळे मी बेरिएट्रिक सर्जरी केली नाही. वजन वाढलं तर मी व्यवस्थित व्यायाम करून माझं वजन कमी करेन. त्यावर तुम्ही (अनिल देशमुख) चिंता करू नका”, असा मिश्किल टोला हसन मुश्रीफ यांनी अनिल देशमुखांना लगावला.

लक्षवेधी झाली असती तर…

“ससून रुग्णालयामध्ये जे तीन प्रकरण घडले. त्यामध्ये ड्रग्स माफिया असलेला ललित पाटील, दुसरे एका व्यक्तीला उंदीर चावल्याचं प्रकरण आणि पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार करणं, या तीन घटनेवर एक लक्षवेधी झाली असती तर आम्ही या प्रकरणात किती कठोर कारवाई केली हे लक्षात आलं असतं”, असं हसन मुश्रीफ यांनी सभागृहात सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla anil deshmukh and mla hasan mushrif discussion to pune sasoon hospital maharashtra monsoon session gkt