“ तुम्हाला हिशोब करायचा असेल तर आमची पण तयारी आहे, कधीपण हिशोब करू एवढं लक्षात ठेवा ”

आमदार शशिकांत शिंदे यांच्या आरोपांवर आमदार शिवेंद्रसिंह राजे यांचे प्रत्युत्तर ; कुणीही इथं घाबरणारं नाही…असंही बोलून दाखवलं आहे.

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

सातारा जिल्हा बँकेतील पराभवानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी शासकीय विश्रामगृह येथील पत्रकारपरिषदेत बोलताना आमदार शिवेंद्रसिंह राजे यांच्यावर आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली होती. त्यावर आता शिवेंद्रसिंह राजे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना प्रत्युत्तर दिले आहे. “ तुम्हाला हिशोब करायचा असेल तर आमची पण तयारी आहे, कधीपण हिशोब करू एवढं लक्षात ठेवा ” असा इशारा देखील यावेळी आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना दिला.

सोनगाव (ता. जावळी) येथे जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या सत्कार सोहळ्यात शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. शिवेंद्रसिंह राजे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्या आरोपांना दिलेल्या प्रत्युत्तरामुळे आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण काहीसे गरम झाल्याचे दिसत आहे.

माझ्या पराभवासाठी शिवेंद्रसिंहराजेच जबाबदार, हे त्यांचंच षडयंत्र – शशिकांत शिंदे

यावेळी शिवेंद्रसिंह राजे म्हणाले, “माझ्यावर खापर फोडून सगळ्या गोष्टांनी जबाबदार मी आहे आणि राष्ट्रवादीमधील इतर नेते आहेत.कुणाला हौस आहे तुमच्या मागे लागायची. काय गरज आहे आम्हाला जिल्हा बँकेत येऊन तुमच्या मागे लागण्याची? शिवाय, राष्ट्रवादीचे ते म्हटले आहेत. आता नेमका त्यांचा कुणाकडे रोख आहे मला माहिती नाही, कारण नाव नाही घेतलं. ते म्हटले की जिल्ह्यातील मोठा नेता पण माझ्याविरोधात होता. आता सगळ्यांनाच काही कामधंदा नव्हता की काय? सगळेच यांच्या मागे कशाला लागले होते मलाच काही कळत नाही. जिल्ह्याचं राजकारण काय, जावळीच्या बँकेच्या निवडणुकी भोवतीच फिरत होतं की काय? मलाच काही कळत नाही. या सगळ्या गोष्टी उगाच सहानुभुती मिळवण्यासाठी आता झालेल्या पराभवानंतर आपल्याला लोकांकडून काही मिळतय का? सहानुभुती इत्यादी.. म्हणून ही सगळी पत्रकारपरिषद वैगेरे तेवढ्यापुरती आहे, यामध्ये तथ्य काहा नाही.”

सातारा जिल्हा बँक निवडणूक : “ मनात आणलं असतं तर सगळे मतदार आम्ही ताब्यात घेतले असते, आणि…”

तसेच, “वस्तूस्थिती ते जे सांगत आहेत ती नाही तर वस्तूस्थिती वेगळी आहे. सगळ्यांनी यांच्यासाठी जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा केला. मतदार जे आहेत ते सर्व इथे आहेत.. शेवटी तर आम्हाला एवढं पण म्हटलं गेलं की, रामराजे पण नको आणि शिवेंद्रबाबा पण नको..सगळ्यांनी म्हटलं इथून जावा, आमचं आम्ही बघून घेऊ. म्हणजे एवढ्या टोकाला विषय गेलेला होता. त्यामुळे उगाच स्वतःच्या चुका आणि स्वतःच्या बगलबच्चांच्या अडचणी त्यांनी ज्या निर्माण केल्यात त्याचं खापर दुसऱ्यांवर फोडण शिंदे यांनी बंद करावं आणि योग्य पद्धतीने राजकारण करावं. या धोपटशाहीचा काही उपयोग होत नाही. कारण, उत्तर द्यायची धमक प्रत्येकामध्ये आहे. कुणी कुणाच्या जीवावर नाही. कुणाचा संसार कुणाची भाकरी कुणामुळे चालत नाही. जो तो कष्टाने करून कमवून खातोय. त्यामुळे कुणी कुणाला मिंदा नाही. हे त्यांनी देखील लक्षात ठेवावं. हिशोब चुकता करतो वैगेरे असली भाषा वापरून, कुणी इथं घाबरणारं नाही. तुम्हाला हिशोब करायचा असेल तर आमची पण हिशोब करायची तयारी आहे, कधीपण हिशोब करू एवढं लक्षात ठेवा. असा इशारा यावेळी शिवेंद्रसिंह राजे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना दिला.”

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे पराभूत

याचबरोबर, “शिवेंद्रराजे म्हणाले, रांजणे यांच्या विजयामुळे जावळीत नवी सुरुवात झाली आहे. यापुढे मी जावळी तालुक्यातील सर्व निवडणुका कोणतीही राजकीय तडजोड न करता मोठ्या ताकदीने त्यांच्याविरोधात लढणार आहे. रांजणे यांचा विजय हा जावळीतील मतदारांनी ठरवून केलेला विजय आहे. पक्षवाढीसाठी पक्षाच्या चौकटीत राहून काम केले म्हणता आणि दुसरीकडे पक्षातच गटबाजी करून पाडपाडीचे धंदे करता. राजेशाही थाटाचा आमच्यावर आरोप केला गेला. मात्र, प्रत्यक्षात शिंदेसाहेब राजेशाही थाट तर तुमचा मोठा आहे. आम्ही सर्वसामान्य आहोत आणि तुम्हीच स्वतः राजेशाही थाटात राजकारण करत आहात. तुमच्या राजेशाहीचा अतिरेक झाला. यामुळेच तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. स्वतःच्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडायचे, असले धंदे आता बंद करा. वस्तुस्थिती स्वीकारा.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mla shivendrasinharajes reply to mla shashikant shinde msr

Next Story
करोनाच्या ओमिक्रोन व्हेरिएंटचा महाराष्ट्राला किती धोका? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी