पक्षातील धुसफूस चव्हाटय़ावर, पक्ष कार्यालयावर हल्ला

कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक निकालात दिग्गजांनाच धक्का बसला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे आणि गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई या दोन दिग्गजांचा झालेला पराभव धक्कादायक मानला जातो. यातही राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिंदे यांचा झालेला पराभव पक्षात गेले काही दिवस सुरू असलेली बंडाळी चव्हाटय़ावर आणणारा आहे. दरम्यान हा पराभव जिव्हारी लागल्याने शिंदे समर्थकांनी आज स्वपक्षाच्या कार्यालयावरच जोरदार हल्ला चढवत नासधूस केली.

जिल्हा बँकेवर सलग सोळा वर्षे एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची या निवडणुकीतही भक्कम पकड होती. ही निवडणूक बिनविरोध होईल असे सुरुवातीचे चित्र होते. मात्र यातील बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, त्यांचे बंधू खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर आदी अकरा जण बिनविरोध निवडून आले. तर उर्वरित दहा जागांसाठी निवडणूक झाली. या दहा जागांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांच्या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. त्यातही  शिंदे आणि पक्षातील अन्य नेत्यांमधील सुंदोपसुंदीमुळे सुरुवातीपासूनच या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागलेले होते.

शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीतीलच ज्ञानदेव रांजणे हे जेमतेम ताकद असलेले उमेदवार उभे होते. मात्र त्यांना जिल्ह्य़ातील आणि राज्य पातळीवरील नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याचे उघडपणे बोलले जात होते. तसेच भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, त्यांचे बंधू खासदार उदयनराजे भोसले यांचाही आशीर्वाद त्यांना होता. यातूनच ही लढत अत्यंत चुरशीची होत अखेर केवळ एका मताने शिंदे यांचा आज पराभव झाला. पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या शिंदे यांचा विधानसभेपाठोपाठ हा सलग दुसरा मोठा पराभव आहे. त्यांचा पराभव होताच त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यालयावर दगडफेक करत जोरदार हल्ला चढवला. तसेच पक्षाच्याच जिल्हा तसेच राज्य पातळीवरील नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे शहरातील वातावरण काही काळ तणावाचे झाले. अखेर पोलिसांनी संतप्त जमावाला पांगवत हल्लेखोरांना ताब्यात घेतले.

दरम्यान अन्य चर्चेच्या लढतीत गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांचा पराभव तर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विजय संपादन केला. या दोन्ही निकालामध्ये भाजपाच्या मतदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

कारागृहातून विजय

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार, बँकेचे मातब्बर संचालक प्रभाकर घार्गे यांना यंदा पक्षाने उमेदवारी नाकारली. ते सध्या कारागृहात आहेत. मात्र त्यांनी पक्षाविरुद्ध बंडखोरी करत कारागृहातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केला. हाही विजय राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारा समजला जात आहे. त्यांच्या विजयामागेदेखील पक्षातील बंडाळीचा हात असल्याचे उघडपणे बोलले जात आहे.