दिवाळीच्या निमित्ताने ठिकठिकाणी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क येथे दीपोत्सव केला जातो. या दीपोत्सवात हजारो दिव्यांची आरास केली जाते. हा दीपोत्सव पाहण्यासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी होत असते. यंदा तर या दीपोत्सवाच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे सहपरिवार उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटनदेखील करण्यात आलं. मात्र, आता या दीपोत्सवाचं क्रेडिट थेट राज्य सरकारनं घेतल्याची बाब समोर आली आहे. दीपोत्सव मनसेकडून आयोजित केला जात असताना त्याची प्रसिद्धी पर्यटन विभागाने केल्याचं समोर आलं आहे. त्यावर मनसेकडून खोचक पोस्टदेखील शेअर करण्यात आली आहे.
कार्यक्रम मनसेचा, क्रेडिट सरकारचं!
महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाकडून मुंबईतील दिवाळीसंदर्भात पाच पोस्ट शेअर एक्सवर शेअर करण्यात आल्या आहेत. “दिवाळीची ‘जादू’ पाहायला चला! तुम्ही जर अजूनही छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा ‘दीपोत्सव’ पाहिला नसेल, तर मुंबईचा सर्वात शानदार ‘प्रकाशमय’ तुमच्याकडून मिस होत आहे”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शिवाय सोबत mtdc च्या वेबसाईटची लिंकदेखील देण्यात आली आहे. या दीपोत्सवासोबतच मुंबईतील रोषणाई अनुभवण्यासाठी इथे येण्याचं आवाहन नागरिकांना पर्यटन विभागाकडून या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
मनसेचा देवेंद्र फडणवीस सरकारला टोला!
दरम्यान, या पोस्टवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देवेंद्र फडणवीस सरकारला खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे. “जेव्हा महाराष्ट्र सरकारचा एक विभाग या दीपोत्सवाचं मार्केटिंग हे स्वतः हा विभाग करत असल्यासारखं दाखवतो तेव्हा विशेष आश्चर्य वाटतं. मनसेला याचं अगदी छोटंसं श्रेय दिलं असतं तर निश्चित आम्हाला आनंद झाला असता आणि सरकारच्या मनाचा उमदेपणा दिसला असता. नाशिकमध्येही मनसेनं जे केलं तेच पुढे तत्कालीन सरकारने केलं अशी जाहिरातबाजी झाली”, असं मनसेनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“तुमचे नेते ते आमचे नेते, तुमचा पक्ष आमचा पक्ष अशी कार्यपद्धती सत्ताधारी पक्षाची आहे हे दिसतंच आहे. पण आता दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रमसुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते”, असा टोलाही मनसेनं लगावला आहे.
फक्त त्यावेळी त्याचं श्रेय आमच्या पक्षाला द्या – मनसे
“आम्ही मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक अभिजात कार्यक्रम यावर्षी केला, दीपोत्सव तर असतोच. असे सामान्यांना आनंद देणारे अनेक उपक्रम आम्ही करत राहणार आहोतच. त्यावेळीदेखील पर्यटन विभागाला ते आमचे आहेत म्हणण्याचा मोह होईल इतके ते छान करू. फक्त त्यावेळेस त्याचं श्रेय आमच्या पक्षाला जरूर द्या म्हणजे झालं”, असा विनंतीवजा टोला या पोस्टमध्ये लगावण्यात आला आहे.
शालिनी ठाकरेंनीही घेतला समाचार!
दरम्यान, राज ठाकरे यांच्या मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीदेखील पर्यटन विभागाच्या या पोस्टवर टीकात्मक टिप्पणी केली आहे. “दुसऱ्यांचे कार्यकर्ते आपल्या कडेवर घ्यायचे. आता तर राजसाहेबांचा कार्यक्रमपण स्वत:चा म्हणून मिरवत आहेत. जनाची नाही, पण मनाची तरी बाळगावी सरकारने”, असं शालिनी ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
