ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कुणाचं? याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयातील कार्यालयात भेट घेतली आहे. यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. भेटीनंतर अमोल कोल्हेंनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

राष्ट्रवादीत बंड होण्यापूर्वी अमोल कोल्हे, सुप्रिया सुळेंसह अजित पवारांच्या निवासस्थानी होते. पण, अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांबरोबर राहण्याचा निर्णय अमोल कोल्हेंनी घेतला होता. आता अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. पण, मतदारसंघातील विकासकामांबाबत ही भेट असल्याचं अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं आहे.

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, “शिरूर मतदारसंघाच्या दृष्टीनं दोन महत्वाचे प्रकल्प आहेत. पुणे-नाशिक रेल्वेचा प्रकल्प हा मंत्रीमंडळाच्या मंजुरीसाठी रखडला आहे. तर, इंद्रायणी ‘मेडिसिटी’सारखा अत्यंत महत्वकांशी प्रकल्प, ज्यात २६ रूग्णालये एक छताखाली एकत्र आणत आहोत. या प्रकल्पांसाठी महाविकास आघाडीचं सरकार असतानाही अजित पवारांची भूमिका महत्वाची होती. हे प्रकल्प पुढे नेण्याबाबत अजित पवारांशी चर्चा झाली.”

अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटाने राष्ट्रवादीतील खासदारांना अपात्र करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींकडे याचिका दाखल केल्या आहेत. यातून राज्यसभा खासदार शरद पवार, लोकसभा खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्याचं आल्याचं समोर आलं आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर अमोल कोल्हेंनी म्हटलं, “मला याबाबत काहीही भाष्य करायचं नाही. कारण, या संपूर्ण प्रक्रियेत मी कुठेही नाही.”