सातारा: नमामी गंगे योजनेच्या धर्तीवर कृष्णा नदीच्या शुद्धीकरणासाठी ‘जय जय कृष्णे’ हा कृष्णा नदी शुध्दीकरणासाठी प्रकल्प राबवण्यात यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांची दिल्लीत भेट घेऊन केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत माहिती देताना उदयनराजे यांनी सांगितले, की कृष्णा नदीला भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. या नदीच्या काठावरील वाई, कराड सारख्या शहरांनाही त्यामुळे मोठे महत्त्व आहे. वाई हे एक तीर्थक्षेत्र, बुद्धीचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. येथे मराठी विश्वकोश मंडळ, प्राज्ञ पाठ शाळा मंडळ कार्यरत असून, यामुळे शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो. तसेच, वाईचे श्री महागणपती मंदिरासह अनेक मंदिर आणि ऐतिहासिक घाट हे कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या प्रमुख आकर्षणांपैकी आहेत. तसेच भुईंज, संगम माहुली, प्रीती संगम कराड, श्री क्षेत्र नरसिंहवाडी आदी तीर्थक्षेत्रे नदी काठी वसलेली आहेत. परंतु, नदीच्या वाढत्या प्रदूषणामुळे तिचे स्वच्छता, सौंदर्य व पावित्र्यता धोक्यात आले आहे. यामुळे कृष्णा नदीचे शुद्धीकरण आणि सुशोभीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.

या योजनेंतर्गत उगमापासून संगमापर्यंत नदीचे शुद्धीकरण आणि पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार अपेक्षित आहे. यामुळे पर्यावरणपूरक विकासास चालना मिळेल आणि जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रालाही मोठी संधी निर्माण होईल, असे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले.

याबरोबरच महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड आणि वाई हा संपूर्ण परिसर देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. त्यामुळे या भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक पावले उचलावीत, अशीही मागणी करण्यात आली. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि लवकरच केंद्र सरकारकडून याबाबत पुढील पावले उचलली जातील, अशी अपेक्षा उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. यावेळी काका धुमाळ, ॲड.विनित पाटील, चंद्रकांत पाटील, करण यादव आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp udayanraje bhosale meet union minister bhupendra yadav over purification project for krishna river zws