अहिल्यानगर : महावितरणने ग्राहकांचे जुने वीज मीटर बदलून तेथे स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू केली आहे. एकूण ७ लाख ५८ हजार ग्राहकांपैकी आतापर्यंत १ लाख ६ हजार ११६ स्मार्ट मीटर बसवले गेले आहेत. स्मार्ट मीटर बसवण्यामागील कारणांची जनजागृती करण्यात महावितरण कमी पडत असल्याने नागरिकांचा विरोध होताना दिसतो आहे. त्यातून आंदोलनेही होत आहेत.

कृषीचे वीजजोडवगळता घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचे सर्व जुने वीज मीटर बदलण्याचे महावितरणचे धोरण आहे. जिल्ह्यात एकूण ७ लाख ५८ हजार असे वीजग्राहक आहेत, तर कृषीचे ३ लाख ५० हजार ग्राहक आहेत. वीज मीटर बदलण्यासाठी महावितरणने नगर जिल्ह्यासाठी एका खासगी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. या ठेकेदाराने जिल्ह्यात २०० कामगार त्यासाठी नियुक्त केले आहेत.

वर्षापूर्वी ही मोहीम सुरू करण्यात आली असली, तरी मध्यंतरी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात ही मोहीम थंडावलेली होती. आता पुन्हा तिला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत १ लाख ६ हजार ११६ जुने वीज मीटर बदलून तेथे स्मार्ट मीटर बसवले गेले आहेत. त्यामध्ये २५ हजार ६३२ नव्याने दिलेल्या वीजजोडण्यांचा समावेश आहे. हे काम दोन वर्षांत पूर्ण करायचे आहे. उर्वरित वर्षभरात जवळपास ६.५ लाख वीज मीटर बदलण्याचे आव्हान महावितरणपुढे आहे. व्यवस्थित सुरू असलेले जुने वीज मीटर का बदलायचे हा नागरिकांचा पुढचा प्रश्न आहे, तर स्मार्ट मीटर अचूक मोजणी करते, त्यामध्ये मोबाइलद्वारे ऑटो रीडिंगची सुविधा आहे, छेडछाड करता येत नाही, असे महावितरणकडून सांगितले जाते. मात्र महावितरणच्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेविरोधात नगर शहरात आंदोलने झाली.

बदल निःशुल्क

केंद्र सरकारच्या धोरणानुसार स्मार्ट मीटर नि:शुल्क बसवले जात आहे. एकूण दोन वर्षांत सर्व जुने मीटर बदलून कृषीवगळता स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. अचूक मीटर रीडिंग, सिम कार्डचा वापर, मोबाइलद्वारे ऑटो रीडिंग, कोणत्या कालावधीत वापर कमी-जास्त झाला हे पाहण्याची व्यवस्था, सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या अतिवापराव्यतिरिक्त सवलतीचा दर अशी त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांमार्फत स्मार्ट मीटर बसवण्यासाठी जनजागृती केली जात आहे. -रमेशकुमार पवार, अधीक्षक अभियंता, महावितरण

सक्ती करू नये

महावितरणने स्मार्ट वीजमीटर बसवण्याची सक्ती करू नये. ते ऐच्छिक ठेवावे. जुने व्यवस्थित चालत असलेले मीटर काढून त्या जागी स्मार्ट मीटर बसवू नये. –विलास जगदाळे, कोषाध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पश्चिम महाराष्ट्र

पुन्हा आंदोलन करावे लागणार

जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजदेयकांत मोठी वाढ होत आहे. जुने मीटर चुकीचे रीडिंग दाखवत होते का? तसे महावितरणने जाहीर करावे. स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक नाही. महावितरणचे कर्मचारी भूलथापा देऊन स्मार्ट मीटर बसवत आहेत. जास्तीचे वीज देयक मिळाल्यानंतर नागरिकांना चूक झाल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन करावे लागणार आहे. –संपत बारस्कर, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

तालुकानिहाय स्मार्ट मीटर

तालुकानिहाय बसवलेल्या स्मार्ट मीटरची संख्या पुढीलप्रमाणे – नगर ३५३१०, संगमनेर १०८०६, राहाता १२३५४, नेवासा ७६८१, पाथर्डी २८७०, शेवगाव ६४४५, पारनेर ६३८३, जामखेड ५८४, कर्जत १०६२, श्रीगोंदा १८८५, अकोले १३७१, कोपरगाव ४७२३, श्रीरामपूर ७३०७, राहुरी ६९१६.