नांदेड : नांदेड विमानतळाची धावपट्टी खराब झाल्याच्या कारणावरून या विमानतळावरील सर्व प्रकारची विमानसेवा मागील आठवड्यापासून बंद करण्यात आल्यामुळे त्याचा पहिला फटका ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांना बसला असून त्यांना मंगळवारचा नियोजित नांदेड दौरा रद्द करावा लागला आहे.
शरद पवार यांचे अत्यंत जुने आणि त्या काळातील निष्ठावान सहकारी, माजी आमदार दिवंगत बळवंतराव चव्हाण तसेच त्यांचे पुत्र-माजी खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या नायगाव नगरीतील पुतळ्यांचे अनावरण, ‘वसंतगाथा’ स्मृतिग्रंथाचे प्रकाशन या संयुक्त आणि भव्य स्वरुपाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी स्वीकारले होते. अन्य सर्वपक्षीय नेतेही वरील कार्यक्रमासाठी निमंत्रित आहेत. पवार यांनी मुंबईहून नांदेडला येण्यासाठी खाजगी विमानाची व्यवस्थाही केली होती. त्यांचा दौरा कार्यक्रमही आखण्यात आला होता. पण गेल्या आठवड्यात नागरी उड्डयन मंत्रालयाच्या संबंधित विभागाने नांदेड विमानतळ अचानक बंद केल्यामुळे गेल्या शनिवारपासून येथील दैनंदिन विमानसेवाही ठप्प झाली आहे.
नांदेड विमानतळासंदर्भातील माहिती सोमवारी समजल्यानंतर पवार यांना दौरा रद्द करावा लागल्यामुळे संयोजकांचा हिरमोड झाला. पावसाळा आणि राज्यभरातील एकंदर वातावरणामुळे मुंबईहून नांदेडपर्यंत हेलिकॉप्टर-चॉपरमधून प्रवास करणे शक्य नसल्याचेही पवार यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे वरील नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. पण तेही येऊ शकणार नसल्याचे कळविण्यात आले.
नायगावच्या चव्हाण परिवारातील खासदार रवींद्र चव्हाण हे या वरील कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आहेत. बळवंतराव आणि वसंतराव यांच्या स्मरणार्थ होणारा कार्यक्रम भव्य स्वरूपाचा व्हावा यासाठी चव्हाण परिवार आणि त्यांचे अनेक सहकारी मागील काही आठवड्यांपासून तयारीमध्ये गुंतले होते. २६ ऑगस्ट हा वसंतराव चव्हाण यांचा पहिला स्मृतिदिन आहे. पण मुख्य निमंत्रित पाहुण्यांचीच अडचण झाल्याचे सोमवारी समोर आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमितभैय्या देशमुख यांच्यासह काँग्रेसचे काही नेते वरील कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थितांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव असून ते रविवारपासून नांदेडमध्ये आहेत.
मागील चार दिवसांपासून नांदेडचे विमानतळ विमान उतरविणे व उड्डाणासाठी बंद करण्यात आल्यानंतर निर्माण झालेली गैरसोय पालकमंत्री अतुल सावे यांच्या कानी घालण्यात आली आहे. या विषयावर ते मंगळवारी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असून येथील विमानसेवा पूर्ववत करण्याचा सावे यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.