नांदेड : नांदेड जिल्ह्यात शनिवारी २५ मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसल्यानंतर रविवारी पुन्हा १३ मंडळांना पावसाने जबर झोडपले. हदगाव तालुक्यात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. शनिवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु, विविध धरणांतून विसर्ग सुरुच असल्याने पाणी ओसरायला तयार नाही. शेतातील खरिपाची संपूर्ण पिके पाण्याखाली गेली असून, रबी हंगाम सुद्धा घेता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. आजवर १३९ टक्के पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत १२५ टक्के पाऊस झाला आहे.
येत्या काही दिवसांत घरी येणारा मूग, सोयाबीन, कापूस आदी पिकांसह हळद, केळी या नगदी पिकांचेही नुकसान झाले आहे. खरे म्हणजे सरसकट नुकसान झाले असून, अगदी उसाला सुद्धा बुरशी चढू लागली आहे.
शनिवारी रात्री जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेडकरांशी संवाद साधताना गोदावरी नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्याचे सांगत सावधगिरीचा इशारा दिला होता. यापूर्वी २००६ मध्ये गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडत ३५७ मीटरला स्पर्श केला होता. यंदाही तशीच परिस्थिती आहे. जायकवाडी, माजलगाव, निम्म दुधना, सिद्धेश्वर, येलदरी या भागांतील सर्व धरणांतून विसर्ग सुरू आहे. याशिवाय मानार नदीवरील लिंबोटी व बारुळ या धरणांतून सुद्धा विसर्ग सुरू आहे. इकडे आसना नदी व पैनगंगा नदी सुद्धा पात्र सोडून वाहत आहेत.
उत्तर तिराच्या दिशेने सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, गोवर्धनघाट, दिलीपसिंग काॅलनी, शनी मंदिर इथपर्यंत पाणी टेकले आहे. तर तिकडे दक्षिण तिरावर कौठा, वसरणी या भागात वसाहतीमध्ये पाण्याने शिरकाव केला. नदीकाठच्या असंख्य नागरिकांना हलविण्यात आले असले तरी त्यांचा संसार मात्र पूर्णपणे बुडाला आहे. नांदेड शहरातील हायटेक सिटीमध्ये पाणी शिरल्याने तेथील २५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. लोहा तालुक्यातील भेंडेगाव येथे पुरात अडकलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची सुटका करण्यात आली.
भालकी (ता. नांदेड) येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या २४ जणांना राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाच्या धुळे येथील तुकडीने सुरक्षित स्थळी हलविले. यात एका गर्भवती महिलेचा समावेश होता. वसरणीच्या साईबाबा कमानीला पाणी टेकले होते. देळुब बु. (ता. अर्धापूर) येथील मंदिर व जामा मशिदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले होते.