नांदेड : शहरात १० फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबारातील मुख्य आरोपी पकडण्यात पंजाब पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाला यश आले आहे. बब्‍बर खालसा इंटरनॅशनलचा अतिरेकी हरविंदरसिंघ ऊर्फ रिंदा संधू याच्‍या सांगण्यावरूनच हा गोळीबार झाल्याचे निष्पन्‍न झाले आहे. नांदेड शहरातल्या गुरुद्वारा परिसरात १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता एकाने केलेल्या गोळीबारात रविंद्रसिंघ दयालसिंघ राठोड (वय ३०) याचा जागीच मृत्‍यू झाला होता. तर गुरुमितसिंघ सेवालाल हा गंभीर जखमी झाला होता. गुरमितसिंघ याने हरविंदरसिंघ याच्‍या भावाची २०१५ मध्ये हत्‍या केली होती, त्‍या प्रकरणात त्‍याला जन्‍मठेपही झाली होती. २२ जानेवारी रोजी तो पॅरोल रजेवर सुटला होता. १० फेब्रुवारीला रविंद्रसिंघ व गुरमितसिंघ हे गुरुद्वारा परिसरातल्या गेट क्र.६ जवळ उभे असताना त्‍यांच्‍यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तीन दिवसानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास दहशतवाद विराधी पथकाकडे वर्ग करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्‍थानिक पोलिसांनी घटनेनंतर आरोपीला मदत करणाऱ्या मनप्रितसिंघ ढिल्लो (वय ३१) व हरप्रितसिंघ कारपेंटर (वय ३५) या दोघांना अटक केली होती, त्‍यानंतर एटीएसने पंजाबमधून दलजितसिंघ करमसिंघ संधू (वय ४१) व हरजितसिंघ गील (वय ३२) या दोघांना अटक केली तर अर्शददीपसिंघ गील (वय २५) याला ताब्‍यात घेण्यात आले. या पाचही आरोपींना न्‍यायालयाने १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. नांदेड स्‍थानिक, एटीएस पथक व पंजाब पोलीस यांच्‍या समन्‍वयातून मुख्य आरोपीचा शोध सुरू होता. नांदेडच्‍या एटीएसने दिलेल्या माहितीनंतर पंजाब पोलीसांनी गोळीबार करणाऱ्या जगदीश ऊर्फ जग्‍गा (रा. तरंतारण) याच्‍या मुस्‍क्‍या आवळल्या तर त्‍याचा साथीदार शुभदीपसिंघ ऊर्फ शुभ या दोघांना अटक केली आहे. जगदीशसिंघ याने गोळीबार केल्याची कबुली पंजाब पोलीसांनी दिली. गुरमितसिंघ याची हत्‍या करण्याचा लक्ष्य होते पण या प्रकरणात रविंद्रसिंघ याचा मृत्यू झाला. कुख्यात अतिरेकी हरविंदरसिंघ याच्‍या सांगण्यावरूनच हा हल्ला केल्याचे त्‍याने कबुल केले आहे. या दोघांना अटक झाल्याने या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा आता झाला आहे.

नांदेड एटीएसचे तीन पथकं सध्या पंजाबमध्येच तळ ठोकून आहेत. या दोघांना अटक झाल्यानंतर तेथील न्‍यायालयाच्‍या परवानगीने त्‍यांना नांदेडला आणण्यात येणार आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत का? याचा शोध सुरू असल्याचे नांदेड एटीएसचे प्रमुख पोलीस उपअधीक्षक माणिक बेद्रे यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी सुरू असल्याचे त्‍यांनी स्‍पष्ट केले. या गुन्‍ह्याची उकल करण्यासाठी नांदेडसह अकोला, छ.संभाजीनगर, नागपूर येथील एटीएसचे अधिकारी प्रयत्‍नरत होते. या गंभीर घटनेचा उलगडा झाल्यानंतर आज सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला. विशेष म्‍हणजे नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार हे या प्रकरणाच्‍या तपासावर लक्ष ठेवून होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nanded firing case main accused detained by police css