छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचा इतिहास हा काँग्रेसने आपल्याला शिकवला वास्तविक महाराजांनी सुरत लुटलं नव्हतं, असं विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, आता भाजपाचे नेते नारायण यांनी यासंदर्भात एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले नारायण राणे?
नारायण राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, मी इतिहास कार नसलो, तरी आतापर्यंत बाबासाहेब पुरंदरेंचा जो इतिहास वाचला, त्यानुसार शिवाजी महाराजांनी सुरतची लूट केली, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.
राजकोट किल्ल्यावरील राड्याबाबतही केलं भाष्य
पुढ बोलताना त्यांनी राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यावरही भाष्य केलं. “दोन दिवसांपूर्वी मी राजकोट किल्ल्यावर गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तिथे गेलो होतो. तिथे पाहण्यासारखं काही नव्हतं, त्यामुळे मी लगेच तिथून निघालो. दुसऱ्या रस्त्याने निघालो होतो. मात्र त्याच वेळी आदित्य ठाकरे आणि त्यांचे लोक तिथे आले. मात्र मी एक आदेश दिला आणि त्यांना दोन तास तिथेच थांबवून ठेवलं. आदित्य ठाकरेंना खाली मान घालून परत जायला लावलं”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – Narayan Rane : “जयंत पाटलांच्या विनंतीमुळे आदित्य ठाकरेंना जाऊ दिलं, नाहीतर…”, नारायण राणे आक्रमक
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
दरम्यान, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध करत जोडे मारो आंदोलन केलं होतं. या आंदोलनाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. “मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला. याची माफी काँग्रेस मागणार का? कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडण्यात आला. त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच काँग्रेसने शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. छत्रपती शिवरायांनी सुरत लुटलीच नाही. उलट सुरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का?” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.