Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. ओळखीच्या कंत्राटदाराला कंत्राट दिलं होतं इथपासून या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाने भ्रष्टाचार केल्याचा आरोपही विरोधकांनी केला. यावरून आता सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या काळातही अशा दुर्घटना घडल्या असल्याचं ते म्हणाले. दहीहंडीच्या निमित्ताने ते मुंबईत आलेले असताना माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण येथील कार्यालयात जाऊन मोडतोड केली. परंतु, या पुतळ्याची उभारणी नौदलामार्फत करण्यात आली होती, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहत होते, त्यामुळे पुतळ्याचे नुकसान झाले असून नौदलाचे अधिकारी मंगळवारी पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतात असं पहिल्यांदाच घडतंय का?

नारायण राणे आज मुंबईत आले असता माध्यमांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी विरोधकांच्या टीकेबाबत विचारलं. त्यावर ते म्हणाले, “असं भारतात पहिल्यांदाच घडलं आहे का? संपूर्ण इमारतीही कोसळल्या आहेत. काँग्रेसच्या काळात अशा किती दुर्घटना घडल्या आहेत. मी (घटनास्थळी) उद्या जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्वांना बोलावलं आहे. सर्व माहिती घेतल्यानंतर मी बोलेन. असं एक क्षेत्र सांगा जिथे काँग्रेस बदनाम झाली नाहीय. ते म्हणतात की बेरोजगारी वाढली, पण तुमच्या काळात किती बेरोजगारी होती? असा सवालही त्यांनी काँग्रेसला विचारला.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळा उभारण्याकरता ज्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आलं होतं तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतला होता, असा आरोप ठाकरे गटा खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर नारायण राणे म्हणाले, “कंत्राट ओळखीच्या लोकांनाच दिलं जातं.”

हेही वाचा >> Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “गंजलेल्या नट-बोल्टमुळे…”, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी कंत्राटदारांवर गुन्हा दाखल

नेमकं काय घडलं?

१५ फूट उंचीचा चबुतरा आणि २८ फूट उंच शिवरायांचा पुतळा अशी येथील रचना होती. अतिशय दिमाखात उभा असलेला हा पुतळा गेल्या आठ महिन्यांत पर्यटकांचे तसंच शिवप्रेमींचं आकर्षण केंद्र बनला होता. मात्र, सोमवारी दुपारी अचानक तो कोसळल्याने शिवप्रेमींना धक्का बसला आहे.