Narayan Rane on Eknath Shinde Shiv Sena Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शिवसेना (उबाठा) व शिवसेना (शिंदे) एकत्र येण्याच्या हालचाली चालू असल्याचं बोललं जात आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. सिंधुदुर्गमध्ये भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला आहे. तर, कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजप आमदार नितेश राणे यांना रोखण्यासाठी शिवसेना (शिंदे) आणि महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात गुप्त बैठक पार पडल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, माजी आमदार व शिवसेनेचे (शिंदे) नेते राजन तेली म्हणाले, “कुठलीही गुप्त बैठक झालेली नाही. मात्र, शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत बैठक घेतली. या बैठकीत एकत्रितपणे शांततेत निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली. यावरून भाजपा नेते व स्थानिक खासदार नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.”
…तर आम्ही शिवसेनेशी (शिंदे) संबंध तोडून टाकू : राणे
कणकवलीमध्ये शिवसेना (उबाठा) व शिवसेना (शिंदे) एकत्र येणार असल्याच्या चर्चेला राजन तेलींकडून दुजोरा मिळाल्यानंतर नारायण राणे म्हणाले, “नाही, तसं काहीही होणार नाही. तसं झालंच तर आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकू. किमान या दोन जिल्ह्यांमध्ये तरी आमचे संबंध तोडून टाकू.”
“राजन तेलींना मी नेता मानत नाही”
“राजन तेली हे कोणी मोठे नेते किंवा पदाधिकारी नाहीत. मी तरी त्यांना नेता मानत नाही. तसेच ते विशाल परब, त्यांना देखील मी नेता मानत नाही. त्यामुळे त्यांचं कुठलंही म्हणणं मी ग्राह्य धरणार नाही. मी त्यांच्या या वक्तव्यांचा विरोधच करेन.”
“मुळात स्वतःची काही प्रतिष्ठा असावी लागते”, नारायण राणेंचा राजन तेलींना टोला
राजन तेली यांनी अलीकडेच वक्तव्य केलं आहे की कणकवलीत शिवसेना (उबाठा) व शिवसेना (शिंदे) एकत्र येण्यासंदर्भात वरिष्ठ नागरिकांकरवी आणि स्वयंसेवी संस्थांकरवी हा विषय वरिष्ठ नेत्यांपुढे मांडला जाणार आहे. यावर नारायण राणे संतापून म्हणाले, मुळात राजन तेली प्रतिष्ठित नागरिकांमध्ये बसत नाहीत. त्यासाठी स्वतःची प्रतिष्ठा हवी. सर्वांनी टाकून दिलेला गाळ एकनाथ शिंदे का जमा करत आहेत हे मला माहिती नाही. मुळात हे राजन तेली काही नेते नाहीत. विशाल परबही नेते नाहीत. हल्ली विचारवंत म्हणून ते वावरत असले तरी मी त्यांना नेता मानत नाही.”
