मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला आयोजित मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरेंनी मनसैनिकांनी मशिदींसमोर स्पीकरवर हनुमान चालिसा वाजवण्याचे आदेश दिले असून यावर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून टीका होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा निषेध केला असून चिथावणीखोर भाषणं करुन लोकांचे प्रश्न मिटणार आहेत का? अशी विचारणा केली आहे. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन आणि नुतन इमारत उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिर्डीमध्ये आयोजित सभेत बोलताना अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंच्या भाषणाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “काही लोक समाजात संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम करतात. कित्येत वर्ष लोक गुण्यागोविंदाने वर्षानुवर्षे एकमेकांना साथ देत आहेत, जातीय सलोखा ठेवला आहे, जातींमध्ये, धर्मात तेढ निर्माण होऊ देत नाही. पण काही पक्षाचे नेते इथं असं करा, इथं हा भोंगा लावा, तिथं हा भोंगा लावा सांगत आहेत”.

“अरे भाषण करणं सोपं आहे रे बाबा. पण आता त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक आम्हाला निवडून यायचं आहे आणि हे काय सांगताय सांगू लागले आहेत. कोणाला तरी बरं वाटण्यासाठी, निवडणुकीवर डोळा ठेवून अशा प्रकारची भाषणं, वक्तव्यं करायची हे आपल्या शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परडवणारं नाही,” असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान अजान आणि हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात तेढ निर्माण केलं जात असल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. प्रत्येकाने आपल्या मर्यादांचं पालन करावं, विनाकारण जातीय आणि धार्मिक वाद निर्माण करु नये असं आवाहन त्यांनी केलं आहे.

“आता एक नवीन वाद, तुम्ही अजान म्हणायची मग आम्ही हनुमान चालिसा म्हणायची. अजान म्हणणाऱ्यांनी जरुर पठण करावं, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांनी ती म्हणावी…पण प्रत्येकाने आपापल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. केवळ दुसऱ्याला विरोध करण्याची भूमिका घेत जाती, धर्मात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते सर्वांसाठी अडचणीचं आहे,” असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar on mns raj thackeray over masjid loudspeaker issue sgy