पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघामधून मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रफुल पटेल यांच्यासह एनडीएतील घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना खास भेटवस्तू देत त्यांच्या डोक्यावर जिरेटोप चढवला होता. मात्र, या जिरेटोपावरून नवीन वादाला तोंड फुटले होते.

खासदार संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली. तसेच पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्याबद्दल शिवभक्तांमधूनही प्रफुल पटेल यांच्याविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. जिरेटोपावरून टीकेची झोड उठल्यानंतर अखेर प्रफुल पटेल यांनी यासंदर्भात ट्विट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

प्रफुल पटेल यांनी काय म्हटलं?

“हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ.”, असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं.

हेही वाचा : “…म्हणून आम्हाला ४०० जागा जिंकायच्या आहेत”, भाजपा नेत्याने स्पष्ट केली भूमिका…

प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप चढवल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. टीकेची झोड उठल्यानंतर भाजपा आणि शिवसेना शिंदे गट आणि प्रफुल पटेल यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यावर आता खासदार प्रफुल पटेल यांनी ट्विट करुन त्यांची भूमिका मांडली. तसेच मोदींना घातलेल्या जिरेटोपामध्ये मोदींचा दोष काय? असाही सवाल उपस्थित करण्यात आला.

शरद पवार गटाचीही पटेलांवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल दाखल केला त्यावेळी प्रफुल पटेल यांच्यासह एनडीएतील घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांच्या डोक्यावर जिरेटोप चढवला. मात्र, जिरेटोप हा हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो. पण प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करत अवमान केल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावरून राजकारण तापल्यानंतर अखेर प्रफुल पटेल यांनी यावर स्पष्टीकरणत देत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ”, अशी प्रतिक्रिया देत या वादावर पडदा टाकला आहे.