भाजपाच्या महामेळाव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका करण्यात धन्यता मानली. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. मुख्यमंत्री महोदय, जर सूर्यावर थुंकाल तर तुमचीच जीभ जळेल, अशा शब्दांत टीका करत तुम्ही चमच्याने दूध पित होता, तेव्हा पवार साहेबांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावला. पुणे जिल्ह्यातील मावळ येथील हल्लाबोल यात्रेत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तटकरे यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. भाजपाने साडेतीन वर्षांत सरकार चालवले की मनोरंजन केले हेच कळत नाही. या कालावधीत या सरकारने लोकांची फसवणूक केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे बोलण्याचा सोयिस्कर कार्यक्रम या सरकारने राबवला आहे. या सरकारला खाली खेचणे आता गरजेचे झाले असल्याचे ते म्हणाले. भाजपाच्या मेळाव्या शरद पवारांवर टीका करणारे फडणवीस जेव्हा चमच्याने दूध पित होते, तेव्हा पवार साहेबांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकारवर घणाघाती शब्दांत हल्ला केला. सत्तेमधील सर्वच लोक फसवणूक करणारे आहेत. या सरकारने सर्व आश्वासनांबाबत मोठा यू टर्न घेतला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १० लाखांचा कोट घालतात. ते म्हणतात मी चौकीदार आहे. मग चौकीदार एवढे महाग कपडे कसे घालतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या सरकारने दहावीच्या पुस्तकात राजकीय पक्षांचा उल्लेख केला आहे. भाजपाचा इतिहास रंगवून सांगितला गेला आहे. भाजपा-सेनेचे उदात्तीकरण केले गेले आहे. मुलांना चुकीचा इतिहास शिकवणे योग्य नाही, असे म्हणत संपूर्ण देशाचे भगवीकरण करणे सुरू आहे. घरांना भगवा रंग दिला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोटाचा रंग भगवा केला आहे. लोकांनी आक्षेप घेतला तेव्हा रंग बदलला गेल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader sunil tatkare criticized on cm devendra fadnavis in maval hallabol rally