२०१९मध्ये शिवसेना-भाजपा युती तुटली आणि महाविकास आघाडी नावाचा नवा प्रयोग राज्यात सुरू झाला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आणि उद्धव ठाकरे या सरकारचे मुख्यमंत्री झाले. पण ज्या मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या वादामुळे शिवसेना-भाजपा ही २५ वर्षांची युती तुटली, त्याच मुख्यमंत्रीपदाची आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पण ती राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदाची नसून महाविकास आघाडीचे पुढील वर्षीच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण असणार? याची आहे. आणि याला कारणीभूत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी जाहीर कार्यक्रमात केलेलं एक विधान ठरलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चार वर्षांत मुख्यमंत्रीपद चर्चेत!

जवळपास चार वर्षांपूर्वी राज्यात ज्या नाट्यमय पद्धतीने निवडणूक निकालांनंतर सत्तास्थापनेचा दीर्घांक रंगला, तेवढ्याच नाट्यमय पद्धतीने सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्ताबदल झाला. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करून शिवसेनेतले तब्बल ४० आमदार आणि १३ खासदार आपल्यासोबत शिंदे गट म्हणून बाहेर काढले. त्यानंतर भाजपाशी युती करून सरकार स्थापनेचा दावाही केला. तेव्हाही आधी मुख्यमंत्री कोण होणार? याची जोरदार चर्चा झाल्यानंतर फडणवीसांऐवजी एकनाथ शिंदेंनी शपथ घेतल्यामुळे मुख्यमंत्री कोण झालं? याची चर्चा रंगली. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्न चर्चेत आला आहे.

एकीकडे सत्ताधाऱ्यांमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही दोन नावं मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार मानली जात आहेत. त्यातही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून सत्ताधारी युतीचे उमेदवार असतील असंच मानलं जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा द्यावा लागलेले उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी मिळणार का? यावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यात तिन्ही पक्षांची चर्चा, जागावाटप आणि जबाबदारी वाटप कसं होणार? हा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी गुरुवारी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात यासंदर्भातलं केलेलं विधान याबाबच सूचक इशारा देणारं मानलं जात आहे.

“देवेंद्र फडणवीसांशी आमच्या गुप्त चर्चा होत असतात”, प्रफुल्ल पटेलांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

काय म्हणाले निलेश लंके?

यावेळी आपल्या भाषणात बोलताना निलेश लंकेंनी राज्याचे विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलं आहे. आत्तापर्यंत मविआतील तिनही पक्षांनी विधानसभा निवडणुका सोबतच लढण्याच्या आपल्या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे जर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल, तर ते संपूर्ण महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ठरू शकतील.

“आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचंय. फक्त व्यासपीठावर बोलण्यापेक्षा दादांची काम करण्याची पद्धत घराघरात पोहोचवण्याचं काम येत्या वर्षभरात करायचं आहे. पुढच्या वर्षी आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. त्यामुळे राज्यातला विकासाचा थांबलेला गाडा घराघरांत पोहोचवणं गरजेचं आहे. मी तर बऱ्याच भाषणांत सांगतो, की अजित पवारांना फक्त पाच वर्षं मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर आपलं राज्य २५ वर्षं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आहे”, असं आमदार निलेश लंके म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp nilesh lanke on ajit pawar maharashtra cm assembly elections pmw