देशभरात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची चर्चा पाहायला मिळत आहे. मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्याचं तर मिधोराममध्ये संपूर्ण मतदान पार पडलं. या महिन्याभरात मध्य प्रदेश, राजस्थान तेलंगणामध्येही मतदान होणार आहे. याशिवाय महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडी यांच्यातील संघर्षावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. त्यातच आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलेली एक सूचक पोस्ट चर्चेत आली आहे. त्यात दिल्लीतील राजकीय सट्टेबाजारातील अंदाजाचा उल्लेख जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे पोस्टमध्ये?

जितेंद्र आव्हाडांनी आज दुपारी शेअर केलेल्या या एक्स (ट्विटर) पोस्टमध्ये महाराष्ट्रातील व देश पातळीवरील निवडणुकांबाबत अंदाज व्यक्त केले आहेत. “दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारात आज सहज काही लोकांशी बोलत होतो. महाराष्ट्राच्या बाबतीतले त्यांचे अंदाज ऐकून मला स्वत:लाच धक्का बसला. त्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीला ३१ ते ३३ जागा मिळतील आणि महायुतीला (भाजपा, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट) १५ ते १७ जागा मिळतील”, असं आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का होत नाही?”, बच्चू कडूंचा रोखठोक सवाल

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात नेमकी कोण बाजी मारणार? यावर सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेतील अपात्रतेच्या मुद्द्यावर ३१ डिसेंबरपर्यंत तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अपात्रतेच्या मुद्द्यावर ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत. या आदेशांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुढील दोन महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा परिणाम पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“पाच राज्यांमधल्या निवडणुकांचा परिणाम…”

दरम्यान, या महिन्यात मतदान होणाऱ्या पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहेत. या निकालांचे परिणाम देशभरात दिसून येतील, असंही आव्हाडांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. “येणाऱ्या काळात पाच राज्यांतील निवडणुकांचा परिणाम संपूर्ण देशभरात दिसू लागेल. या पाच राज्यांबाबत दिल्लीतील राजकीय सट्टेबाजारातील लोकांचा अंदाज असा आहे की पाचपैकी किमान ४ राज्यांत काँग्रेसला विजय मिळेल. राहुल गांधींची जोरदार हवा आहे”, असं आव्हाडांनी नमूद केलं आहे. त्यांच्या या पोस्टवर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar faction mla jitendra awhad on five states elections results pmw