“जयंत पाटील सध्या असंबद्ध आणि मुद्द्याल सोडून बोलत आहेत. त्यांना त्यांच्याच पक्षात कुणी विचारत नसल्यामुळे ते त्यांच्या पक्षात नाराज आहेत. सध्या जयंत पाटील कुठे दिसतायत का बघा? लोकसभेची एवढी मोठी निवडणूक सुरू असताना जयंत पाटील कुठेही दिसत नाहीत. सगळीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारच दिसत आहेत. जयंत पाटील आहेत कुठे?” असा प्रश्न उपस्थित करत ‘समझदार को इशारा काफी है’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना लगावला. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना जयंत पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना टोला लगावला.

दोन नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध कसे सुरू झाले?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात दोन दिवसांपूर्वी शाब्दिक युद्ध सुरू झाले. शुक्रवारी इंदापूर येथील महायुतीच्या सभेत ‘बारामतीची लढाई ही पवार विरुद्ध पवार नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे’, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. फडणवीस यांच्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

जयंत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस याचे हे विधान हास्यास्पद आहे. ही लढाई कोणाच्या विरोधात आहे, हे बारामतीकरांना माहिती आहे. बारामतीकर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्याच पद्धतीने देतील. मात्र, यामध्ये नरेटिव्ह बदलण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. कदाचित सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना समोर आली असेल. त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा त्यांचा छोटासा प्रयत्न असेल.”

देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानाला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “बारामतीकर त्याच पद्धतीने…”

श्रीकांत शिंदेंना आमचा विरोध नाही

भाजपाकडून श्रीकांत शिंदेंना विरोध असल्याच्या चर्चा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावल्या. भाजपाचा श्रीकांत शिंदेंना पाठिबा असून श्रीकांत शिंदे हे कल्याणमधील शिवसेनेचे आणि पर्यायाने महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजपा त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार आहे. तसेच विक्रमी मतांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधूण आम्ही सगळे, आमची युती त्यांना निवडून आणेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

म्हमून भाजपाला ३३ जागा मिळाल्या नाहीत

भाजपा ४८ पैकी ३३ जागांवर निवडणूक लढवेल, असे सांगितले जात होते. मात्र आता २६ ते २७ जागांवरच भाजपा लढेल असे दिसत आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तीन पक्ष एकत्र असल्यामुळे मित्रपक्षांचा सन्मान राखणे हेदेखील महत्त्वाचे आहे. ३३ जागा लडू असा दावा आम्ही कधीही केला नव्हता. तिघांचा सन्मान राखून मिळणाऱ्या जागांवर लढले पाहिजे, असा आमचा प्रसत्न आहे

भाजपच्या ४४ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने बोलताना फडणवीस म्हणाले की, मी भारतीय जनता पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्वांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा देतो. स्थापना दिनाच्या निमित्ताने आम्ही संकल्प केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू. जोपर्यंत वंचितांचा विकास होत नाही, भाजपाचा एक-एक कार्यकर्ता काम करेल. भारताला सुजलाम-सुफलाम करूनच आमची विकसित भारत संकल्प यात्रा थांबेल, असेही ते म्हणाले.