आयसीसी टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने विजय मिळविल्यानंतर संपूर्ण भारतातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जगज्जेता संघ काल भारतात परतल्यानंतर मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली. तर आज महाराष्ट्राच्या विधीमंडळात कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या मुंबईकर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी चारही खेळाडूंनी आपले अनुभव सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजकीय टोलेबाजी करणारे भाषण केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “पाकिस्तानला हरवलं तेव्हा अर्धा विश्वचषक आपण तिथेच जिंकला होता. संपूर्ण भारतातून आपल्या संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुंबईतील विजयी मिरवणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर मुंबईकर रस्त्यावर उतरतील असे कुणालाही वाटलं नव्हतं. रोहित शर्मा आणि सूर्यकुमारने मला विचारलं की, एवढी गर्दी होती, पोलिसांनी कसं व्यवस्थापन केलं. मी त्यांना म्हणालो, हे आमचे मुंबईचे पोलीस आहेत. एका रुग्णवाहिकेला पोलिसांनी गर्दीतून बाहेर काढले. एका मुलीला चक्कर आल्यानंतर तिला खांद्यावर उचलून पोलिसाने बाहेर काढलं. काम माणूसकीचेही दर्शन झालं. मुंबईकरांनी काल दिवाळी-दसऱ्या प्रमाणे आनंद साजरा केला. भारतीय संघात चार मुंबईकर खेळाडू होते, याचा आम्हाला विशेष आनंद आणि अभिमान वाटतो.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, मीदेखील विश्वचषकाचा अंतिम सामना पाहत होतो. एकाक्षणी असं वाटलं की, आपण सामना गमावतो की काय. मी आपल्या खेळाडूंना विचारलं की, तुम्हाला त्यावेळी कसं वाटत होतं. पण खेळाडूंना आत्मविश्वास होता, असे ते म्हणाले. अंतिम सामन्यात बुमराह आणि हार्दिकने अप्रतिम गोलंदाजी टाकत सामना खिशात घातला.

एकनाथ शिंदे यांनीही सूर्यकुमारच्या कॅचचे कौतुक केले. तो कॅच हुकला असता तर काय झालं असतं, हे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, सूर्यकुमारच्या त्या कॅचच्या आठवणीने डेव्हिड मिलरही रात्री झोपेतून उठत असेल. १९८३ साली विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पकडलेला कॅच आणि सूर्यकुमारने पकडेला कॅच क्रिकेट विश्वात अजरामर झालेला आहे.

आमच्या ५० जणांच्या टीमनेही विकेट काढली

“माझ्या आधी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चांगलीच बॅटिंग केली. आमचं राजकारण क्रिकेटसारखंच आहे. यातही कुणी, कुठे, कशी विकेट घेईल काही सांगता येत नाही. जसं सूर्यकुमारचा कॅच कुणी विसरू शकत नाही, तसं आमच्या ५० जणांच्या टीमने दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट कुणीही विसरू शकणार नाही. दोन वर्षांपासून आम्ही सर्व बॅटिंग करतोय”, असे सांगून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.

राजकारणात कधी कोण बाद होईल…

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, क्रिकेटपासून लोकांना जो आनंद मिळतोय, तसाच आनंद राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर खुलावा, असा आमचा प्रयत्न आहे. क्रिकेट हा खेळ कुठल्याही जाती-धर्माचा नाही. आमच्या राजकीय क्षेत्रात मात्र कोण कधी कुणाला बाद करेल, कुणाला रन आऊट करेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे आम्हालाही रोहित शर्मा, सूर्यकुमारसारखी चांगली बॅटिंग करावी लागते. आता सभागृहात बसलेले अनेक आमदार आपल्या भाषणाच्या माध्यमातून चौकार, षटकार मारत असतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No one will forget suryakumar catch and the wicket taken by our 50 man team cm eknath shinde dig on ubt and mva kvg