​सावंतवाडी : गोवा राज्यात फिरून आलेला ‘ओंकार’ नावाचा एकटा हत्ती सध्या सावंतवाडी तालुक्यातील कास, सातोसे परिसरात शेती बागायतीमध्ये वावरत आहे, तर पाच हत्तींचा एक कळप दोडामार्ग तालुक्यातील कोलझर परिसरात पोहोचला आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी हे सहाही हत्ती दोडामार्ग तालुक्यातील केर, निडली परिसरात एकत्रित आले होते, पण त्यानंतर ओंकार हत्ती एकटाच गोवा राज्यात पोहोचला होता. आता तो महाराष्ट्र-गोवा राज्याच्या सीमेवरील गावात असून, वन विभागाच्या पथकाच्या म्हणण्यानुसार हे हत्ती लवकरच पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे.

​शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड नासधूस

​गेल्या चार दिवसांपासून ओंकार हत्तीमुळे सावंतवाडी तालुक्यातील मडुरा, कास आणि सातोसे परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. हत्तीने शेतातील उभी पिके मोठ्या प्रमाणात तुडवली असून, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अक्षरशः पायाखाली तुडवला गेला आहे. या प्रचंड नासधुसीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी वारंवार वनविभागाकडे लक्ष वेधूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. केवळ फटाके लावून हत्तीला पळवून लावणे आणि पाळत ठेवणे एवढ्यापुरतीच वन विभागाची कार्यवाही मर्यादित असल्याचा थेट आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

वरिष्ठ पातळीवरून ठोस निर्णयाचा अभाव

ग्राउंड लेव्हलचे वन कर्मचारी आपापल्या परीने हत्तीवर लक्ष ठेवून आहेत, मात्र वरिष्ठ पातळीवरून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. शेतकऱ्यांच्या उपजीविकेसोबतच त्यांच्या जीवालाही थेट धोका निर्माण झाला आहे. रोणापालचे माजी सरपंच सुरेश गावडे यांनी या गंभीर परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी वनमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा कठोर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

वीस वर्षांपासून फक्त आश्वासने

कर्नाटक राज्यातील दांडेली अभयारण्यातील हत्ती सन २००२ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या दोडामार्ग तालुक्यातील मांगेली सीमेवरून आले होते. आंतरराज्य तिलारी पाटबंधारे प्रकल्पामुळे आणि पुरेशा अन्नाच्या उपलब्धतेमुळे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात वावरत राहिले.

वन विभागाने नुकसान भरपाई देण्याचा आणि फटाके वाजवून हत्तीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या निवास आणि खाद्याकडे दुर्लक्ष केले. सध्या पालकमंत्री नितेश राणे आणि माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर हे हत्तींना ‘वनतारा प्रकल्पात पकडून नेण्यात येईल’ असे सांगत आहेत. मात्र, लोकांच्या शेती-बागायतीचे प्रचंड नुकसान करणाऱ्या हत्तींच्या बाबतीत गेल्या वीस वर्षांत फक्त आश्वासने देऊन शेतकरी व बागायतदार यांची बोळवण केली जात असल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे.

कासचे सरपंच प्रवीण पंडित यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. ओंकार हत्तीमुळे उद्भवलेले हे संकट केवळ शेतकऱ्यांच्या उपजीविकेलाच नाही, तर त्यांच्या सुरक्षेलाही धोका पोहोचवत आहे. ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, आता प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.