आज पहाटे चारच्या सुमारास राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या या निकालानंतर आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काही अपक्ष आमदारांनी आम्हाला मतं दिली नसल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांनी मोठं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांची नऊ मतं आम्ही शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना दिली होती. पण आम्हाला अपेक्षित मतं मिळाली नाहीत. काही अपक्ष आमदारांनी आम्हाला मतं दिली नाहीत. प्रत्येक उमेदवाराला ४२ मतं द्यायची हे आम्ही ठरवलं होतं. त्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या आमदारांनी योग्य पद्धतीने मतदान केलं. माझ्यावर प्रेम असणाऱ्या कुणीतरी एकानं मला एक मत जास्त दिलं. संजय राऊत यांना देखील ४२ मतं मिळाली असती, पण शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत बाद ठरवल्याने त्यांना ४१ मतं मिळाली.”

पाच अपेक्षित मतं आम्हाला मिळाली नाही, यामुळे फार मोठा फटका महाविकास आघाडीला बसला असं म्हणता येणार नाही. मतांमध्ये फार मोठा फरक नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करण्यासाठी जामीन मिळाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे २ मतं कमी झाली. शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं एक मत निवडणूक आयोगानं बाद ठरवलं. आणि काही अपक्ष आमदारांनी आम्हाला मतदान केलं नाही.

हेही वाचा- महाविकास आघाडीचे संख्याबळ घटले; फडणवीस यांच्या गनिमी काव्याने शिवसेना चितपट

पण राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयंत पाटील आणि अजित पवार यांनी महाविकास आघाडीला मतं मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मित्रपक्ष आणि सरकारला पाठिंबा दिलेले इतर अपक्ष आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. एमआयएम आणि समाजवादी पक्षाशीही ते बोलले, असं प्रफुल्ल पाटील म्हणाले. ते नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Our 9 senior leader vote for sanjay pawar but independent mla not voted us said ncp mp prafulla patel rmm