Premium

“ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ न येवो”, पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे म्हणाल्या, जसं एखादं विवाहबंधन असतं, तसंच आपल्या संघटनेशी आपलं एक बंधन असतं.

Pankaja Munde
पंकजा मुंडे भाजपावर नाराज असल्याची सध्या चर्चा आहे. (PC : Pankaja Munde Facebook)

भाजपा नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने ऐकायला मिळत आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना पक्षाकडून विधान परिषदेवर पाठवलं जाईल अशी चर्चा होती. परंतु, त्यांना तशी संधी मिळाली नाही. तेव्हापासून त्या राज्याच्या सत्तेच्या राजकारणापासून बाजूला ढकलल्या गेल्या. तसेच पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. कारखान्याची सुमारे १९ कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे पंकजा मुंडे सध्या पक्षनेतृत्वावर नाराज असल्याचं बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना डबघाईला आल्यामुळे तो वाचवण्यासाठी पंकजा मुंडे यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, अद्याप त्यांना अमित शाह यांच्याकडून भेटीसाठी वेळ मिळाला नाही. पंकजा मुंडे यांची पक्षात घुसमट होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या आगामी काळात वेगळा निर्णय घेऊ शकतात. असा दावा त्यांच्या विरोधकांकडून सातत्याने होत आहे. या सगळ्यावर पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका मांडली.

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यानी नुकतीच टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांना पक्षावरील नाराजीबाबत आणि त्या आगामी काळात वेगळा निर्णय घेऊ शकतात याबाबतच्या चर्चांवर प्रश्न विचारला. या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्याविषयी अशा अफवा कोणीही पसरवू नका. मी ईश्वराकडे प्रार्थना करेन की माझ्यावर असा निर्णय घ्यायची वेळ येऊ नये.

पंकजा मुंडे म्हणाल्या, जसं एखादं विवाहबंधन असतं, तसंच आपल्या संघटनेशी आपलं एक बंधन असतं. आपण नकळत एकमेकांना वचनं दिलेली असतात, आणाभाका घेतलेल्या असतात, शपथा घेतलेल्या असतात, शब्द दिलेले असतात. आपण एका विचारधारेवर प्रेम केलेलं असतं. त्यामुळे असा निर्णय एखाद्या व्यक्तीला घ्यावा लागत असेल तर ते त्याच्यासाठी वेदनादायी असतं. माझ्यासाठी तर ते प्रचंड वेदनादायी असेल. कारण मी माझ्या वडिलांना या संघटनेत पाहिलं आहे. त्यामुळे या संघटनेशी माझं वेगळं नातं आहे. त्यामुळे असा निर्णय घेण्याची वेळ माझ्यावर येऊच नये, अशी माझी प्रार्थना आहे. ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ न येवो.

हे ही वाचा >> “मला गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्ष करावा लागतोय”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“पंकजा मुंडे असा निर्णय घेईल तेव्हा ती तुम्हा सगळ्यांना बोलावून सांगेल. उगीच सगळ्यांनी आपली डोकी लावून बातम्या करू नका. त्याचा माझ्या राजकीय कारकीर्दीवर वाईट परिणाम होतो”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pankaja munde says i should not be in situation where i have to make decision over upset with bjp asc

First published on: 27-09-2023 at 16:24 IST
Next Story
सततच्या ‘कोंडी’त पंकजा मुंडे, नाराजीचा परिघ देवेंद्र फडणवीसांपासून अमित शहांपर्यंत